जालना जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस, पिके गेली पाण्याखाली

जालना, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर, घन सावंगी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला. मंठा तालुक्यातील पाटोदा, मंठा, सावंगी, पेवा, तळतोंडी माळतोंडी, देवठाणा या गावांना पुराचा फटका बसला. या जोरदार पावसामुळे पांगरी खुर्द गावातील 200 ते 250 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं. गावातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने रात्री ग्रामस्थ मध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं होतं. याशिवाय अनेक ठिकाणी पिके ही पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी परिसरात खरीप पिकांची अती मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली. या अती मुसळधार पावसामुळे खरीप पिक पाण्याखाली गेली. जालन्याच्या अंबड, घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून त्याचा फटका खरीप पिकांना बसला. अंबड घनसावंगी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकातच पावसाचे पाणी साचले असून शेतांना नद्यांचे स्वरूप आलं.
घनसावंगी तालुक्यातील मुरमा, कंडारी, आंतरवाली टेंभी, रामसगाव, शेवता, बानेगाव च्या काही शिवारात ढगफुटी सदृश पाऊस पडून खरिपाची कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी, तूर, आदी पिके पाण्याखाली गेल्याने या भागातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.