उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

 उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात आज सकाळी ढगफुटीची भीषण घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली असून जीवितहानी व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. ढगफुटीमुळे खीर गंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात अचानक प्रचंड पावसाचा जोर वाढला आणि त्यातून निर्माण झालेला चिखल आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह गावावर झपाट्याने आघात झाला. परिणामी अनेक घरं ढिगाऱ्याखाली दबली गेली आणि संपूर्ण गाव दहशतीच्या सावटाखाली आले.

उत्तरकाशी जिल्ह्याच्या एसपी सरिता डोभाल म्हणाल्या की, ग्रामस्थांना त्यांच्या घरातून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. स्थानिक पोलिस, एसडीआरएफ, आयटीबीपी आणि आर्मी राजपूत रायफल्सचे जवान मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी उपस्थित आहेत. एसपी म्हणाल्या की, वाटेत आणखी एक भूस्खलन झाले आहे, ज्यामुळे आमचे काही पथक वाटेत अडकले आहेत. असे असूनही, प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि बचाव कार्य सुरू आहे.

डेहराडूनमधील लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल मनीष श्रीवास्तव म्हणाले की, हर्षिलमध्ये ढगफुटी झाल्याची आणि लष्कराच्या छावणीला झालेल्या नुकसानीची कोणतीही माहिती नाही. ते म्हणाले की, धरालीमध्ये ढगफुटी झाल्यानंतर १५ मिनिटांनी सुमारे १०० लष्करी जवानांची टीम बचावकार्यासाठी पोहोचली. आतापर्यंत २० जणांना वाचवण्यात आले आहे.

या दुर्घटनेत सध्या ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे, तर सुमारे ५० लोक बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराच्या विशेष पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत व बचावकार्य सुरू केले आहे. स्थानिक प्रशासन सतत परिस्थितीवर नजर ठेवून आहे आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी इतर गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले असून, केंद्र सरकारकडून संपूर्ण मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. या घटनेने ढगफुटीसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका किती भयावह असू शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

परिस्थितीवर लक्ष ठेवून, प्रशासनाने स्थानिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली असून हवामान खात्याने पुढील काही तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष उत्तरकाशीच्या दिशेने लागले आहे, जिथे संकटमुक्तीचे प्रयत्न जीवाची बाजी लावून सुरू आहेत.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *