मुंबईत ‘क्लीन अप मार्शल’ची सेवा ४ एप्रिलपासून बंद

 मुंबईत ‘क्लीन अप मार्शल’ची सेवा ४ एप्रिलपासून बंद

मुंबई दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क):
मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शहरातील ‘क्लीन अप मार्शल’ची सेवा ४ एप्रिल २०२५ पासून थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या या मार्शलविरोधात वारंवार तक्रारी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, ४ एप्रिलनंतर ‘क्लीन अप मार्शल’कडून दंड आकारणी होत असल्यास नागरिकांनी संबंधित वॉर्ड ऑफिसशी संपर्क साधावा.
मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी महानगरपालिकेने ‘स्वच्छ मुंबई अभियान’ अंतर्गत क्लीन अप मार्शलची नियुक्ती केली होती. शहरातील २४ प्रशासकीय विभागांमध्ये १२ संस्थांच्या माध्यमातून प्रत्येकी ३० मार्शल नियुक्त करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही काळात अनेक तक्रारी समोर आल्या. त्यामध्ये कराराच्या अटींचे पालन न करणे, अधिक दंड वसूल करणे, अनधिकृत ठिकाणी कारवाई करणे, बायोमेट्रीक हजेरीबाबत हलगर्जीपणा, असभ्य वर्तन आणि महानगरपालिकेच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे प्रकार समोर आले.
या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेने संबंधित संस्थांचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, या संस्थांना दंडही ठोठावण्यात आला आहे.
यासोबतच, ‘स्वच्छ मुंबई अभियान’ बंद होणार नसून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नव्या उपाययोजना लवकरच राबवल्या जातील, अशी माहिती उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी दिली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *