सुरक्षित व स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या प्रयोगाला मोठे यश
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऊर्जेची वाढती गरज भागवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांवर ताण न येता सुरक्षित आणि स्वच्छ ऊर्जानिर्मितीसाठी अमेरिकेत सुरू असलेल्या एका प्रयोगाला मोठे यश मिळाले आहे. यायावर अधिक संशोधन होऊन खरोखर ऊर्जा निर्मिती प्रकल्प अस्तित्वात आले, तर केवळ एक ग्लास पाण्यापासून एका घराला वर्षभर पुरेल इतकी वीज निर्माण होऊ शकेल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
अणुकेंद्रकांच्या संयोगातून (न्यूक्लिअर फ्यूजन) ऊर्जानिर्मिती करण्याच्या प्रयोगाला अमेरिकेतील संशोधकांना मोठे यश आले आहे. या प्रक्रियेसाठी लागलेल्या ऊर्जेपेक्षा अधिक ऊर्जेची निर्मिती करण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून त्यामुळे कार्बनमुक्त आणि सुरक्षित ऊर्जानिर्मितीचा पर्याय उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.
कॅलिफोर्नियामधील लॉरेन्स लिव्हरमोअर राष्ट्रीय प्रयोगशाळेत अणुकेंद्रक संयोगाच्या प्रयोगाला मोठे यश लाभल्याची घोषणा अमेरिकेच्या ऊर्जासचिव जेनिफर ग्रॅनहोम यांनी मंगळवारी जाहीर केले.
अणुऊर्जा निर्माण होताना अणुकेंद्रकांचे विघटन (Nuclear fission) केले जाते. त्याप्रमाणेच दोन अणुकेंद्रकांचे मिश्रण (Nuclear Fusion) केले तरीही मोठी ऊर्जानिर्मिती होते. सूर्यासारख्या ताऱ्यांमधील ऊर्जा याच अणुकेंद्रक संयोगाचा परिणाम आहे. त्यामुळे एका अर्थी ही प्रयोगशाळेमध्ये ‘सूर्य’ तयार करण्याची प्रक्रिया असून त्यावर जगभरातील अनेक देशांमध्ये गेल्या दशकभरापासून प्रयोग सुरू आहेत
SL/KA/SL
14 Dec. 2022