या दिवशी साजरा होणार अभिजात मराठी भाषा दिन

मुंबई, दि. ४ : राज्यात हिंदी भाषा सक्तीवरुन आणि मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायावरुन दररोजच विविध कारणांनी वाद उत्पन्न होत आहेत. मराठीला अभिजात दर्जा मिळूनही मातृभाषेची परवड सुरु असल्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. हे शमवण्यासाठी आता सरकार विविध उपाय योजत आहे.येत्या ३ ऑक्टोबर रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळून वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने ३ ऑक्टोबर हा दिवस यापुढे मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री या बैठकीस उपस्थित होते.
यासंदर्भात बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, मराठी भाषा मुळातच अभिजात होती. तिला दर्जा मिळावा यासाठी राज्याने दशकभर प्रयत्न केले. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील अभिजात मराठी भाषा समितीने महत्त्वाचे काम केले. मराठी भाषा विभागाने भाषा संचालनालय , मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य संस्कृती महामंडळ, राज्य मराठी विकास संस्था यांच्या माध्यमातून मराठीचा अखंड जागर सुरू ठेवला आहे. मराठी साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषकांसह मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी पर्वणी ठरत आले आहे. ३ ऑक्टोबर हा दिवस यापुढे मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.