सैन्य दलाच्या शस्त्रास्त्र प्रदर्शनाला नागरिकांचा
प्रचंड प्रतिसाद

नाशिक, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय सैन्य दलाच्या सामर्थ्याची ओळख सर्वसामान्य नागरिकांना व्हावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांशी अग्नीवीर योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती व्हावी आणि युवकांना सैन्य दलात सामील होण्याची स्फूर्ती मिळावी या उद्देशाने नाशिक मध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नो युवर आर्मी अर्थात आपल्या सैन्य दलाची ओळख या लष्करातील शस्त्रास्त्र तोफा आणि उपकरणांच्या दोन दिवसीय प्रदर्शनाला नाशिककरांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
रविवारी संध्याकाळी नाशिकच्या ईदगाह मैदानावर हे प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. अबाल वृद्धांच्या गर्दीमध्ये बालक युवक युवती आणि महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. एरवी चित्रपटातून अथवा टीव्हीवरील बातम्यांमध्ये पाहायला मिळणाऱ्या विविध प्रकारच्या तोफा, रॉकेट लॉन्चर उपकरण प्रत्यक्ष बघण्याचा युद्ध साहित्याबरोबर छायाचित्रण करण्याचा आनंद लुटला.
आधुनिक लष्करी साहित्य समर्थपणे चालवून शत्रूच्या सैन्यावर विजय मिळवणाऱ्या आपल्या लष्करी वीर जवानांबरोबर प्रत्यक्ष बोलण्याचा, त्यांच्याकडून या शस्त्र साहित्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा अनुभव घेताना मिळणारा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. सैन्यदलामध्ये वापरात असणाऱ्या 19 प्रकारच्या अत्याधुनिक तोफा, रॉकेट लॉन्चर मशीन , गन रडार आणि अन्य उपकरणे जवळून बघण्याचा त्याला स्पर्श करण्याचा आणि या युद्ध साहित्याबरोबर छायाचित्रण करण्याचा आनंद प्रदर्शनात सहभागी झालेल्या प्रेक्षकांनी मनमुराद लुटला .
दोन दिवस या युद्ध साहित्याबरोबर असणाऱ्या लष्करातील वीर जवान आणि अधिकाऱ्यांनी प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीला न कंटाळता प्रेक्षकांना शस्त्रास्त्र आणि उपकरणां बद्दल माहिती देऊन आणि उत्साहाने त्यांच्याबरोबर छायाचित्रण करून आपल्या शारीरिक आणि मानसिक संयम आणि सामर्थ्याचा परिचय करून दिला.
संध्याकाळी सुमारे पाच तास चाललेल्या समारोप समारंभात शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी च्या जवानांनी विशेषतः महिलांनी मोठा सहभाग नोंदवला. समारोप समारंभात तोफखाना दलाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बँडने विविध देशभक्तीपर गीत सादर करून प्रेक्षकांमध्ये नवीन स्फूर्ती निर्माण केली.
विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट वरिष्ठ लष्करी अधिकारी हरी मोहन अय्यर , तोफखाना दलाचे कमांडर रागेश, कर्नल एस के पांडा यांच्यासह अनेक लष्करी अधिकारी समारोप समारंभाला उपस्थित होते.
नाशिकच्या तोफखाना केंद्रात सुरू असणाऱ्या अग्नी वीर योजनेबद्दल माहिती देणारे छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. युवकांनी या प्रदर्शनातून अग्नीवीर योजनेबद्दल माहिती घेतली आणि अग्नीवीर योजनेत , सैन्य दलात सहभागी होण्याबद्दल उत्सुकता दाखवली. भारतीय सैन्य दलाच्या सामर्थ्याची माहिती देणारे अशा प्रकारचे प्रदर्शन वारंवार आयोजित व्हावे ज्यामुळे नागरिकांमध्ये देशभक्ती मोठ्या प्रमाणात जागृत होईल.
सैन्यदलाबद्दलचा आदर आणि अभिमान वाटेल आणि देशविघातक कारवाया करणाऱ्या प्रवृत्तींना देखील जरब बसेल असे मत प्रेक्षकांनी व्यक्त केलं.
ML/KA/SL
20 March 2023