वसईतील ख्रिस्ती धर्मगुरूवर हिंदू पद्धतीने होणार अंत्यसंस्कार

 वसईतील ख्रिस्ती धर्मगुरूवर हिंदू पद्धतीने होणार अंत्यसंस्कार

मुंबई, दि. २३ : वसईचे सुप्रसिद्ध ख्रिस्ती धर्मगुरू फादर हिलरी फर्नांडिस यांचे भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८६ वर्ष होते. फादर फर्नांडिस यांनी स्वतःच्या मृत्युपत्रात व्यक्त केलेल्या इच्छेनुसार, त्यांच्या पार्थिवावर ख्रिस्ती परंपरेप्रमाणे चर्चमध्ये दफन विधी न करता हिंदू संस्कृतीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या पाचुंदर येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत.

त्यांच्या निधनाबद्दल वसई- विरारसह विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. गुरुवार, २२ जानेवारी रोजी त्यांचे पार्थिव उत्तन येथील लेडी ऑफ दि सी चर्चमध्ये श्रद्धांजलीसाठी ठेवण्यात आले होते. आज, २३ जानेवारी रोजी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव वसई पश्चिमेच्या तरखड येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले. त्यानंतर सकाळी ११ वाजता पाचुंदर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

फादर हिलरी यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३८ रोजी वसईतील तरखड गावात झाला. डिसेंबर १९७२ मध्ये त्यांना ख्रिस्ती धर्मगुरूपदाची दीक्षा मिळाली. त्यांनी वसई आणि मुंबई धर्मप्रांतात सेवा कार्य केले असून सुरुवातीची अनेक वर्षे ते गिरीज येथील जीवन दर्शन केंद्राचे संचालक होते.

त्यांचे व्यक्तिमत्त्व वास्तववादी होते. त्यांच्या लेखन व भाषणातून ते नास्तिक असल्याचा भास अनेकांना व्हायचा, मात्र ते येशूची उपासना करीत आणि श्रद्धेने जीवन जगत.

ज्येष्ठ लेखक रेमंड मच्याडो यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, “फादर हिलरी हे ख्रिस्ती उपासनेत क्रांती घडवून आणणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने वसईने एक महान धर्मगुरू गमावला आहे.”

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *