चिपळूणमधले डॉ. तेजानंद गणपत्ये सलग दुसऱ्यांदा आयर्नमॅन…

 चिपळूणमधले डॉ. तेजानंद गणपत्ये सलग दुसऱ्यांदा आयर्नमॅन…

रत्नागिरी, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी फुल आयर्नमॅन ही जागतिक पातळीवरची स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधले डॉक्टर तेजानंद गणपत्ये यांनी सलग दुसऱ्यांदा पूर्ण केली आहे. कर्करोगावर मात केल्यानंतर काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीने ते इथपर्यंत पोहचले आहेत.

ऑस्ट्रेलियातल्या बसलटनमध्ये नुकतीच जागतिक आयर्नमॅन ही Triathlon प्रकारातील स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ३८०० मीटर अंतर पोहणं, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटरहून अधिक अंतर धावणं हे तिन्ही क्रीडा प्रकार सलगपणे १७ तासांमध्ये पूर्ण करायचे लक्ष ठेवण्यात आले होते. उंच लाटा, पाऊस, बोचरे वारे, थंड हवामान अशा आव्हानात्मक परिस्थितीत चिपळूणच्या डॉक्टर तेजानंद यांनी १३ तास ५२ मिनिटांमध्ये म्हणजे गेल्या वेळे पेक्षा कमी वेळात ही स्पर्धा पूर्ण केली आणि आयर्नमॅन किताब मिळवला.

गेल्या वर्षी कझाकस्तानमध्ये त्यांनी १५ तास १७ मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण केली होती. विशेष म्हणजे तेजानंद यांनी कर्करोगाला हरवून जिद्दीने हे यश मिळवले आहे. २०१९ मध्ये झालेल्या घशाच्या कर्करोगावर त्यांनी जिद्दीने मात केली आणि वैद्यकीय प्रॅक्टिस पुन्हा सुरू केली. दोन वर्षं कठोर प्रयत्न करून सायकलिंग, पोहणं, धावणं याचा कसून सराव केला. अनेक मॅरॅथॉनमध्ये सहभाग घेतला. आयर्नमॅन स्पर्धेची तयारी करण्यासाठी कोल्हापूरचे आयर्नमॅन पंकज रावळू, आशिष रावळू यांच्याकडे त्यांनी प्रशिक्षण घेतलं. कुटुंबीय आणि मित्रमंडळींचे भक्कम पाठबळ तसेच प्रशिक्षकांमुळे आपल्याला हे यश मिळाल्याचं ते सांगतात.

जिद्दीने आयर्नमॅन सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये डॉक्टर तेजानंद यांनी मिळवलेले यश खेळाडूंसाठी खूपच प्रेरणादायी आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूंना देखील त्यांच्याकडून प्रेरणा मिळत आहे. आव्हान कितीही मोठं असलं तरी ते जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सहज गाठता येतं. हेच डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी आपल्या यशातून दाखवून दिलं आहे .

ML/ML/PGB 21 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *