चिनी ‘बोन ग्लू’ , 2 मिनिटांत जोडेल मोडलेले हाड

चीनच्या वैद्यकीय संशोधन क्षेत्रात एक क्रांतिकारी शोध समोर आला आहे—‘बोन ग्लू’, जो फक्त २-३ मिनिटांत मोडलेली हाडं जोडण्याची क्षमता ठेवतो. चीनमधील आघाडीच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या या नवीन बायोमटेरियलचा वापर हाडांच्या फ्रॅक्चरवर अतिशय प्रभावीपणे केला जात आहे. हे ग्लू पूर्णतः बायोडिग्रेडेबल असून, हाडं बरे झाल्यानंतर ६ महिन्यांत शरीरात विरघळते, त्यामुळे धातूच्या इम्प्लांट्सची गरजच उरत नाही.
या बोन ग्लूचा विकास समुद्रातील सीप्सपासून प्रेरणा घेऊन करण्यात आला आहे. समुद्राच्या लाटा आणि प्रवाहांमध्येही सीप्स घट्ट चिकटून राहतात—हीच संकल्पना वापरून डॉ. लिन जियानफेंग यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करण्यात आले. विशेष म्हणजे, हे ग्लू रक्ताने भरलेल्या वातावरणातही हाडं जोडू शकते, जे पारंपरिक सर्जरीसाठी मोठं आव्हान असतं.
या बोन ग्लूचा वापर आतापर्यंत १५० हून अधिक रुग्णांवर यशस्वीपणे करण्यात आला आहे. पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये लागणारा वेळ, खर्च आणि वेदना कमी करण्यासाठी हे एक रामबाण उपाय मानलं जात आहे. यामुळे दुसऱ्या शस्त्रक्रियेची गरज टळते आणि संसर्गाचा धोका देखील कमी होतो.
दरवर्षी जगभरात कोट्यवधी लोक हाड तुटण्याच्या समस्येला सामोरे जातात. अशा वेळी चीनचा हा शोध वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवणारा ठरू शकतो. चीनने या बोन ग्लूसाठी आंतरराष्ट्रीय पेटंट (PCT) साठीही अर्ज केला आहे, ज्यामुळे भविष्यात हे तंत्रज्ञान जागतिक स्तरावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा शोध केवळ तंत्रज्ञानाचा चमत्कार नसून, लाखो रुग्णांच्या वेदनांना दिलासा देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे.