चीनचा अमेरिकेवर पलटवार, लावला ८४% कर

बिजिंग, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रचंड प्रमाणात टेरीफ कर लादून जगातील अनेक देशांना अडचणीत आणणाऱ्या अमेरिकेवर आता जशास तसा कर लावून चीनने चांगलाच पलटवार केला आहे. अमेरिकेने चीनवर आधी ३४ टक्के आयात शुल्क लावलं होतं. त्यानंतर चीननेही अमेरिकन वस्तूंवर आणखी ३४ टक्के आयात शुल्क लावलं होतं. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा चीनी मालावर १०४ टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली. त्यामुळे चीनला मोठा धक्का बसला. यानंतर आता चीननेही मोठी घोषणा करत अमेरिकन वस्तूंवर ८४ टक्के वाढीव आयात कर लादण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनच्या वाणिज्य मंत्रालयानेही १२ अमेरिकन कंपन्यांना निर्यात नियंत्रण यादीत टाकल्याचे म्हटले आहे. यापूर्वी, ‘अविश्वासू’ कंपन्यांच्या यादीत ६ कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता. त्याच वेळी, अमेरिकेने चीनवर लावलेला १०४% कर आजपासून लागू झाला आहे. याचा अर्थ असा की, आतापासून अमेरिकेत येणारे चिनी सामान दुप्पट किमतीपेक्षा जास्त किमतीला विकले जाईल.
ट्रम्प यांना उत्तर देताना चीनने म्हटले की, अमेरिका आमच्यावर आणखी शुल्क वाढवण्याची धमकी देऊन एकामागून एक चुका करत आहे. या धमकीवरून अमेरिकेची ब्लॅकमेलिंग वृत्ती उघड होते. चीन हे कधीही स्वीकारणार नाही. जर अमेरिका स्वतःच्या इच्छेनुसार वागण्याचा आग्रह धरत राहिली तर चीनही शेवटपर्यंत लढेल.