मुंबईतून लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
मुंबई पोलिसांनी लहान बाळांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी सखोल तपास केला. या तपासातून पोलिसांनी लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीत एका डॉक्टराचादेखील समावेश आहे. तसेच आरोपी हे मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये काम करत असल्याची देखील माहिती पोलिसांच्या तापासातून समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीतल्या 7 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून आतापर्यंत 14 लहान बाळांची विक्री झाल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांना आपल्या कारवाईत 2 बाळांची सुखरुप सुटका करण्यात यश आलं आहे. मुंबईतल्या काही हॉस्पिटलमध्ये हे आरोपी काम करत होते. त्यामुळे आता काही हॉस्पिटलही मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत.मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या केलेल्या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे :
वंदना अमित पवार
शितल गणेश वारे
स्नेहा सूर्यवंशी
नसीमा खान
लता सुरवाडे
शरद देवर
डॉ. संजय सोपानराव खंदारे
या प्रकरणात एक आरोपी डॉक्टर संजय सोपानराव खंदारे याचे दिवा येथे एक क्लिनिक आहे. हा डॉक्टर मूळचा नांदेडचा रहिवासी आहे. या रॅकेटमधील त्याचा सहभाग आढळून आला आहे. कदाचित या डॉक्टरकडे लहान मुलांचे पालक गेले असावेत. तिथे त्यांचा संपर्क झाला असावा. हा आमचा संशय आहे, असं पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
विक्रोळीमधून एका बाळाची विक्री करुन रत्नागिरी देण्यात आलं होतं. खास करुन तेलंगणामधून या बाळांची डिमांड होती आणि त्यानुसार या बाळांची विक्री केली जात होती. तेलंगणा आणि हैदराबादमधून खास करुन या बाळांच्या खरेदीचा प्रस्ताव होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व आरोपींना 7 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आरोपींनी या गँगच्या माध्यमातून विक्री केलेल्या लहान बाळांमध्ये 11 मुले आहेत. तर 3 मुली आहेत. कमीत कमी 5 दिवस ते जास्तीत जास्त 9 महिने असं विक्री केलेल्या बाळांचं वय आहे, अशीदेखील माहिती पोलिसांनी दिली आहे.
SL/ ML/SL
28 April 2024