मुख्यमंत्री शिंदे झाले कार्यरत, महायुतीत चर्चा झाली सुरू

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेले काही दिवस आजारी असणारे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता बरे झाले असून आज त्यांनी ठाण्यातल्या खाजगी रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करून घेतली आणि त्यानंतर ते आपले अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले. तिथूनच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. यामुळे गेले तीन दिवस रखडलेली महायुतीतल्या मंत्रिमंडळासंदर्भातील चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री शिंदे आजारी पडल्यामुळे महायुतीतली सरकार स्थापने संदर्भातील चर्चा होत नव्हती. कालही डॉक्टरानी शिंदे यांना आराम करायला सांगितल्यामुळे ते ठाण्यातल्या निवासस्थानीच होते. मात्र काल सायंकाळपासून त्यांनी राजकीय चर्चांना सुरुवात केल्याचे समजते, त्यामुळेच भाजपाच्या वतीने गिरीश महाजन यांनी काल रात्री त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यातून सरकार स्थापनेचा मार्ग प्रशस्त केल्याचे समजते. महाजन यांनी चर्चा केल्यानंतर थेट फडणवीस यांचे निवासस्थान असलेला सागर हा बंगला गाठला आणि त्यातूनच चर्चा पुढे सरकल्याचे स्पष्ट झाले आहे .
याचाच परिणाम म्हणून आज महायुतीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांनी एकत्रितपणे आझाद मैदानातील सरकारच्या शपथविधीच्या तयारीची पाहणी देखील केली यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह शिवसेनेचे गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील आदी सहभागी झाले होते. यामुळे महायुतीची गाडी पुन्हा एकदा रुळावर आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र शिवसेनेच्या वतीने संजय शिरसाठ आणि गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिंदे यांना गृहमंत्री पद मिळावे असा राग आळवला आहे.
दरम्यान उद्या सकाळी दहा वाजता भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होत असून त्यात पक्षाचा नेता म्हणजेच राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल हे स्पष्ट होईल. विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हेच भाजपाचे विधिमंडळ पक्षाचे नेते असतील आणि पर्यायाने तेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. त्यांच्यासोबतच दोन उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही शपथ घेतील. या तिघांसोबत तिन्ही पक्षांचे अन्य काही सदस्य मंत्रिपदाची शपथ घेतील असे बोलले जात आहे. ही संख्या एकूण 25 या घरात असेल असेही समजते.