मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन

मुंबई, दि. १४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई डबेवाला इंटरनॅशनल एक्सपिरीयन्स सेंटरचे उद्घाटन केले. ही गॅलरी शहरातील प्रसिद्ध टिफिन वाहकांच्या १३५ वर्षांच्या प्रवासाचे चित्रण करते. “येथे येणाऱ्यांना डबेवाल्यांच्या इतिहासाची झलक दिसेल,” असे फडणवीस उपनगरीय वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले. डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर केवळ २५.५० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वांद्रे पश्चिम येथे ‘डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी डबेवाल्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार श्रीकांत भारतीय, योगेश सागर, तमिळ सेल्वन यांच्यासह नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्ट चे अध्यक्ष उल्हास मुके, मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे, सचिव किरण गवांदे आदी उपस्थित होते.
कार्यालयीन कर्मचाऱ्यांना घरी शिजवलेले जेवण कार्यक्षमतेने पोहोचवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील डबेवाला प्रणालीची स्थापना १८९० मध्ये झाली. एका व्यक्तीने जेवणाचा डबा देण्याची विनंती पूर्ण केल्यापासून त्याची सुरुवात झाली आणि हजारो डबेवाले दररोज दोन लाखांहून अधिक जेवणाचे डबे पोहोचवत मोठ्या प्रमाणात काम करू लागले.
SL/ML/SL