स्वातंत्र्यवीर सावरकर  प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केला राहुल गांधींचा निषेध. 

 स्वातंत्र्यवीर सावरकर  प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केला राहुल गांधींचा निषेध. 

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर  टीकेचा भडीमार केला. आजही राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान का करतात? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आणि असेच चालू राहिले तर त्यांना राज्यात फिरणे मुश्किल होईल असे ते म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, सावरकर हे देशाचे दैवत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी यातना सहन केल्या. त्यामुळे राहुल गांधी यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आजही ते म्हणाले की, माफी मागायला मी सावरकर नाही. तर ते सावरकरांना समजता काय? असा सवाल विचारत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात राहुल गांधींचा निषेध व्यक्त केला. एक दिवस राहुल गांधी यांना कोलूला जुंपले पाहिजे मग त्यांना यातना कळतील असे ते म्हणाले.

अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. यावेळी विरोधी पक्षांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले विरोधकांनी उत्तर न ऐकताच सभागृहातून पळ काढला. काही लोक सभागृहाबाहेर स्टंट करण्यात मश्गुल आहेत. त्यांच्यात उत्तर ऐकण्याचे धाडस नाही, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राहुल गांधी यांनी सेल्युलर जेलमध्ये राहून दाखवावे.राहुल गांधी यांनी मोदींविरोधात वक्तव्य केले. राहुल गांधी यांना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. त्याची अंमलबजावणी लोकसभा सभागृहाने केली. अजूनही ते तसे वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्रातील जनता हे विसरणार नाही. त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ज्या कायद्यामुळे राहुल गांधी निलंबित झाले. तो कायदा मनमोहनसिंग यांच्याच कार्यकाळात झाला आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अधिवेशनात विक्रमी कामकाज केले. पंचामृत योजनेमुळे आपण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलो. मेट्रोची योजना पुढे आणली. महिलांसाठी एसटीमध्ये ५० टक्के सवलत दिली. याचा आपण ७ दिवसात अध्यादेश काढला. त्यामुळे हे खऱ्या अर्थाने गतिमान सरकार आहे. यामुळे विरोधकांना धडकी भरली.Chief Minister condemned Rahul Gandhi in the case of Swatantra Veer Savarkar.

एकनाथ शिंदे म्हणाले, आनंदाचा शिधा हा पाडवा ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत देणार आहोत. आज बळीराजावर संकट आलेले आहे. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. अडचणीच्या काळात मागे पुढे पाहणार नाही. एनडीआरएफचे नियम डावलून शेतकऱ्यांना मदत केली आहे. ५० हजारांपर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देत आहोत.

कुणाची खाजगी मालमत्ता किंवा प्रायव्हेट लिमीटेड कंपनीप्रमाणे सरकार काम करत नाही, असा टोला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मुंबईच्या विकासाचे रुतलेले विमान आता टेक ऑफ घेऊन चालले आहे. मुंबई बदलत आहे , सुंदर होत आहे. हे आत्मीयतेने होत असलेले काम आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध चर्चांना उत्तर देत आहेत.
अनेक वाहतूक प्रकल्पातील अडथळे दूर केले आहेत,विरोधकांची मळमळ , जळजळ घालवण्यासाठी पंचामृत कामाला येईल, ते अर्थसंकल्पातून मिळेल.

मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती सुरू आहे , पुनर्विकासाचे,  एस आर ए चे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जात आहेत, त्यासाठी कायद्यात बदल केला जातो आहे.
केंद्राकडून राज्यासाठी ३२,७८० कोटी मिळाले आहेत, त्यातून राज्याचा आणि मुंबईचा विकास करीत आहोत. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ML/KA/PGB
25 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *