सरन्यायाधीशांच्या मातोश्री जाणार RSS च्या व्यासपीठावर?
अमरावती, दि. २९ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावती महानगरतर्फे ५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या पत्रिकेत त्यांचे नाव छापले गेले असून अमरावती परिसरात त्या पत्रिका मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात आल्या आहेत.
मात्र, या निमंत्रणानंतर एक नवे वादळ उठले आहे. कमलताई गवई यांनी समाजमाध्यमांवर एक स्वलिखित पत्र प्रसारित केले असून त्यात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, “संघाच्या विजयादशमी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार असल्याची बातमी धादांत खोटी आहे. आम्ही आंबेडकरी विचारधारेचे पक्के समर्थक असून संविधाननिष्ठ राहिलो आहोत. मला विश्वासात न घेता कार्यक्रम पत्रिकेत नाव छापणे हे संघाचे षडयंत्र आहे.”
या पत्रामुळे वाद निर्माण झाला असतानाच कमलताईंचे सुपुत्र आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “आईसाहेबांनी संघाचे निमंत्रण स्वीकारले आहे. वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे म्हणजे विचारधारेचा स्वीकार नव्हे. आमचे वडील रा.सू. गवई यांचे सर्व पक्षांशी संबंध होते, आणि आम्हीही पक्षविरहित संबंध ठेवतो.”
या संमिश्र प्रतिक्रियांमुळे कमलताई गवई यांच्या उपस्थितीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. काही संघ पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी कमलताईंची भेट घेऊन निमंत्रण दिले होते आणि त्यांच्या होकारानंतरच पत्रिकेत नाव छापले गेले. मात्र, कमलताईंचे पत्र खोटे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून कमलताई गवई यांची उपस्थिती अंतिमतः काय ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.