छोटा मटकाची गर्जना आता कैदेत

 छोटा मटकाची गर्जना आता कैदेत

चंद्रपूर दि १३:- ताडोबाच्या जंगलात अनेक वर्षे आपला दबदबा निर्माण करणारा आणि पर्यटकांच्या मनाचा लाडका ठरलेला वाघ छोटा मटका (टी-१२६) आता जंगलाचा राजा राहिला नाही. काल त्याला चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधून नागपूरजवळील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये हलविण्यात आले. जंगलात मुक्तपणे हिंडणारा हा बलाढ्य नर वाघ उर्वरित आयुष्य कैदेतच व्यतीत करणार आहे.

१२ मे रोजी छोटा मटका आणि ब्रह्मा (टी-१५८) यांच्यात झालेल्या रक्तरंजित प्रादेशिक लढाईत ब्रह्माचा मृत्यू झाला, तर छोटा मटका गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याची तब्येत खालावत गेली. शिकार करण्याची ताकद हरपलेल्या या वाघाची अवस्था अशी झाली की, तो गावाजवळ दिसू लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तज्ज्ञांनी केलेल्या तपासणीत त्याच्या डाव्या पुढच्या पायात गंभीर फ्रैक्चर, तर तीन प्रमुख दात मोडलेले असल्याचे समोर आले. या जखमांमुळे जंगलात राहून तो जगू शकणार नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून दखल घेत ताडोबा प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर २७ ऑगस्ट रोजी छोटा मटका पकडण्यात आला. काही दिवसांच्या उपचारानंतर अखेर त्याला गोरेवाड्यात हलविण्याचा निर्णय झाला. छोटा मटका आता आयुष्यभर बंदिस्त पिंजऱ्यात राहील, ही बाब निसर्गप्रेमींसाठी नक्कीच वेदनादायी आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *