छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी स्मारकस्थळे उभारणार
पुणे, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक येथील समाधी स्थळ आणि तुळापूर येथील बलिदान स्थळ ही पावन तीर्थक्षेत्रे असून ती अनेक पिढ्यांना त्यांची कीर्ती, शौर्य, पराक्रम यांची प्रेरणा आणि ऊर्जा देणारी ठरावीत यासाठी ही दोन्ही स्मारक स्थळे छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी करण्यासाठी शासन अत्याग्रही असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकास आराखडा भूमिपूजन कार्यक्रम आणि जाहीर सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळापूर ता. हवेली जिल्हा पुणे येथे झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, पुणे म्हाडाचे उपाध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सर्वश्री राहुल कुल, महेश लांडगे , अशोक पवार यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती संभाजी महाराजांनी मोगल, सिद्धी, पोर्तुगीज अशा अनेक परकीय सत्तांशी जीवनभर अखंड संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वराज्याच्या पायाभरणीवर छत्रपती संभाजी महाराजांनी कळस चढविला, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा साम्राज्यापेक्षा 15 पट मोठे असणाऱ्या मोगल साम्राज्याला छत्रपती संभाजी महाराजांनी जेरीस आणले. त्यांनी अनेक लढाया केल्या संपूर्ण जीवनात हे एकही लढाई हरले नाहीत . ते प्रखर धर्माभिमानी होते . धर्मकारण , अर्थकारण यात निर्विवाद वर्चस्व गाजवणारे छत्रपती संभाजी महाराज राजकारणात निपुण होते. त्याचबरोबर ते अत्यंत कुशल संघटकही होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या खुणा आणि त्यांचा इतिहास जपणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शावर महाराष्ट्राची प्रगती, विकास आणि राज्यकारभार शासन करीत आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य, त्यांच्या जीवनात बदल घडविण्याचे कार्य, बळीराजाच्या पाठीशी ठाम राहण्याचे कार्य आज महाराष्ट्र शासन करत आहे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
गुलामीची बंधने झुगारून परकीय आक्रमणाला कणखर उत्तर देणारे धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा राजा होणे नाही, असे सांगून त्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या या भूमीत विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
स्मारक विकासासाठी 397 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तुळापूर येथे स्मारकासाठी आठ एकर जागा उपलब्ध झाली आहे. यामध्ये पार्किंग, बगीच्या, शौचालय यासारखी अनेक विकास कामे करण्यात येतील. तर वढु बु. येथे दोन एकर जागा उपलब्ध झाली असून केईएम हॉस्पिटला देण्यात आलेली आणखी दोन एकर जागा ताब्यात घेऊन एकूण चार एकर जागेत छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आणि परिसराची विकास कामे करण्यात येतील. याकामांतर्गत संग्रहालय, प्रशासकीय कार्यालय, वैद्यकिय कक्ष, सभागृह, स्मरणिका दुकाने, छत्रपती संभाजी महाराज यांचे 60 ते 65 फुट उंच धातूचे प्रतिकात्मक शिल्प, अडीचशे मीटर लांबीचा वॉकींग प्लाझा, जीएफआरसी तंत्रज्ञानावर आधारित संभाजी महाराजांच्या जीवनपटाची, विचारधारांची आणि साहित्याची माहिती दर्शविणारे भित्तीचित्रे, भिमा नदीच्या घाटाचा विकास, बोटीचे फलाट विकसीत करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
ML/KA/SL
2 March 2024