छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ…

मुंबई दि २०:– राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल झाली असून काल रात्री झालेल्या मोठ्या राजकीय खेळीनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ नाराज होते, मात्र आता त्यांची नाराजी दूर करत त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आले आहे , यानिमित्ताने ओबीसी वर्गाला खुश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर उसळलेल्या जनक्षोभाला शांत करण्यासाठी धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या एका ओबीसी मंत्र्याच्या जागी त्याच समाजातील नेतृत्व असणाऱ्या भुजबळ यांना मंत्री करून मुंडे यांचे अन्न व नागरी पुरवठा खातं भुजबळांकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.
आजच्या शपथविधी कार्यक्रमासाठी काल रात्री उशिरा राजभवनात तयारी सुरु झाली होती, रात्री उशिरा याबाबतचे प्रसिद्धीपत्रक माध्यमांना देण्यात आले मात्र त्यात कोणाचाही उल्लेख नव्हता. काल रात्री अनेकांना सकाळी ९ वाजता उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. अखेर आज सकाळी राज्यपाल सी राधाकृष्णन यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ दिली.