चेंबूर शालेय परिसर तंबाखुमुक्त घोषित; १८७ दुकानांना नोटीस

मुंबई, दि. २८ (एम एमसी न्यूज नेटवर्क): परिमंडळ-७ मधील शालेय परिसर तंबाखुमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक मोहीम राबवत कठोर कारवाई केली. मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवस कृती आराखड्यानुसार आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार या मोहिमेला वेग देण्यात आला. पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान हाती घेण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत परिमंडळ-७ चेंबूर मधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली. कोटपा कायद्याच्या कलम ६(ब) नुसार २५७ शाळा आणि ३८ महाविद्यालयांच्या परिसरात धूम्रपान निषिद्ध असल्याचे फलक बसवण्यात आले, त्यापैकी २०३ फलक पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने लावण्यात आले. शासनमान्य १८७ दुकानांना नोटीस बजावण्यात आली, तर मुंबई महापालिकेच्या मदतीने ४५ अतिक्रमित पानटपऱ्यांचे निष्कासन करण्यात आले. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या इसमांविरुद्ध ६३५ प्रकरणांमध्ये कारवाई करून १ लाख २७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यानंतर पोलिस अधिकारी, शिक्षक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांच्या संयुक्त समितीने ५३ शाळांची पाहणी केली. यामध्ये शालेय परिसर तंबाखुमुक्त झाल्याचा आढावा घेण्यात आला. या मोहिमेचा समारोप २७ मार्च २०२५ रोजी महाकवी कालिदास नाट्यगृह, मुलुंड पश्चिम येथे एका विशेष कार्यक्रमाद्वारे करण्यात आला. या वेळी अपर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर, अभिनेता पुष्कर श्रोत्री, हास्य कलाकार गौरव मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात शालेय परिसर तंबाखुमुक्त झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. मोहिमेत विशेष योगदान देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. यापुढेही शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ किंवा १०० क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर यांनी केले.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी आणि अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) डॉ. महेश पाटील यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, असे पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर यांनी सांगितले.
SW/ML/SL
28 March 2025