आता बोटस्वानाहून भारतात येणार चित्ते
जयपूर,दि. १० : आफ्रिका खंडातील नामिबीयानंतर आता बोटस्वाना या देशातून भारतात चित्ते आणण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपिंदर यादव यांनी दिली. तसेच वाघ संवर्धनाच्या धोरणांचा सर्वांगीण आढावा केंद्र सरकारकडून घेतला जाणार आहे.
राजस्थानच्या अलवर येथे झालेल्या ‘वाघ क्षेत्र राज्यांचे मुख्य वन्यजीव रक्षक आणि व्याघ्र प्रकल्पांचे फील्ड डायरेक्टर्स यांच्या परिषद’ या उद्घाटन सत्रात केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली.
यादव म्हणाले की, भारताने देशात नामशेष झालेल्या वन्य प्रजातीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी स्थलांतर केले असून हा प्रकल्प आता भारतात जन्मलेल्या चित्त्यांच्या तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचला आहे. बोटस्वानाहून येणारी चित्त्यांची नवीन तुकडी फेब्रुवारीच्या अखेरीस भारतात येण्याची अपेक्षा आहे.
वाघांसह इतर वन्यजीव जंगलातील मुख्य क्षेत्राबाहेर येण्याच्या प्रश्नावर बोलताना यादव म्हणाले, ‘वाघ व इतर वन्यजीव मुख्य क्षेत्राबाहेर येऊ लागल्यावर सक्षम प्रतिसाद यंत्रणेची गरज अत्यंत महत्त्वाची ठरते. जखमी प्राणी, संघर्षजन्य प्रकरणे, पोरके बछडे आणि तणावग्रस्त इतर प्राण्यांसाठी वेळेवर हस्तक्षेप आवश्यक असतो. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पांच्या आसपास बचाव, पुनर्वसन आणि संक्रमण उपचार केंद्रांसाठी स्पष्ट व मानकीकृत चौकट विकसित करणे गरजेचे आहे.’
SL/ML/SL