बिबट्यांचा वावर असलेल्या क्षेत्रातील शाळांच्या वेळेत बदल
अहिल्यानगर, दि. १८ : राज्यातील ग्रामीण भागांमध्ये बिबट्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. बिबट्याने लहान मुलांचा बळी घेतल्याच्याही अनेक घटना घडल्याने गावोगावचे पालक घाबरून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला असून, जनजागृती कार्यक्रम राबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
हिवाळ्याच्या सुरुवातीमुळे लवकर अंधार पडतो. यामुळे विद्यार्थी शाळेतून घरी परतताना अंधारात प्रवास करतात. या वाढत्या अंधारामुळे त्यांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे ते बिबट्यांच्या हल्ल्यांना अधिक बळी पडू शकतात. बिबट्यांच्या हल्ल्यांचा धोका आणि लवकर पडणारा अंधार लक्षात घेता, बिबट्यांचा वावर असलेल्या भागांतील शाळांच्या वेळेत बदल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समिती/शाळा समितीच्या मंजुरीने शाळांची वेळ सकाळी ९:३० ते दुपारी ४:०० अशी करण्यात आली आहे. जेणेकरून विद्यार्थी अंधार पडण्यापूर्वी घरी पोहोचू शकतील.
अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये, विशेषतः पारनेर आणि नगर तालुक्यात, बिबट्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये विद्यार्थ्यांना इजा झाली आहे. या वाढत्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे.
SL/ML/SL