मुलांची झोप पुरेशी व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदला

 मुलांची झोप पुरेशी व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदला

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अलीकडच्या काळात सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीनंतरही मुले जागी राहतात. परंतु शाळांसाठी त्यांना लवकर उठावे लागते , त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप चांगली व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली. मुलांच्या दप्तराचा भार हलका करण्यासाठी ‘पुस्तक – विहीन’ शाळा, ई – वर्ग यांना चालना द्यावी तसेच शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करावे अशाही सूचना राज्यपालांनी केल्या.

राज्यपाल बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शालेय शिक्षण विभागाच्या सहा प्रोत्साहनात्मक योजनांचा राजभवन येथे शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’, ‘गोष्टींचा शनिवार’, ‘आनंददायी वाचन’, ‘दत्तक शाळा उपक्रम’, ‘माझी शाळा माझी परसबाग’, ‘स्वच्छता मॉनिटर – २’ , मुंबई महानगर पालिकेच्या नवीन शालेय इमारतींचे लोकार्पण आदी योजनांचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास , पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सुरज मांढरे आदी उपस्थित होते.

राज्यात शेकडो सार्वजनिक ग्रंथालये आहेत. मात्र आज ग्रंथालये ओस पडली आहेत. अधिकतर पुस्तके जुनी किंवा कालबाह्य झाली आहेत. सर्व वाचनालयांना इंटरनेट, कॉम्पुटर सुविधा देऊन नवसंजीवनी देणे आवश्यक आहे. यासाठी ग्रंथालय दत्तक योजना देखील चालू केली पाहिजे व ग्रंथालयांचा कायापालट केला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

आजकाल विद्यार्थी केवळ पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञान ग्रहण करीत नसून ते इंटरनेट, समाज माध्यमे यांसह विभिन्न स्रोतांमधून ज्ञान मिळवत आहेत. मुलांचा बुद्ध्यांक वाढत असून शिक्षकांनी अध्ययनाच्या बाबतीत अद्ययावत राहिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हाती केवळ सुरक्षित सामग्री पोहोचावी या दृष्टीने पालक आणि शिक्षकांनी जागरूक राहिले पाहिजे. सायबर गुन्ह्यांपासून मुलांचे रक्षण व्हावे यासाठी शाळांमध्ये व्याख्याने , सत्रांचे आयोजन केले जावे अशीही सूचना राज्यपालांनी केली.

शिक्षण विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व्हावे व्हावे या दृष्टीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ कमी द्यावा तसेच खेळ आणि इतर कृतिशील उपक्रमांवर भर द्यावा असे राज्यपालांनी सांगितले.

मंदिर, मस्जिद, चर्च नसले तरीही चालेल, पण आदर्श शाळा पाहिजे

गावांमध्ये एकवेळ मंदिर, मस्जिद अथवा चर्च नसले तरीही चालेल, परंतु आदर्श शाळा असावी असे सांगून राज्य शासन शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य देत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्याच्या कानाकोपऱ्यात संस्कार देणाऱ्या आदर्श शाळा निर्माण झाल्या पाहिजे असेही त्यांनी सांगितले. उद्योगपती मुकेश अंबानी हे स्वतः शाळांच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी गुंतवणूक करण्यास तयार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून शासन लाखो लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ तसेच मुंबईतील शाळांना कौशल्य शिक्षणाशी जोडण्याच्या योजनेबाबत आपण व्यक्तिशः लक्ष घालू असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात सेलिब्रिटी स्कुल्स सुरु करणार

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात संगीत, नाटक, वक्तृत्व आदी शिक्षण देणाऱ्या ‘सेलिब्रिटी शाळा निर्माण करणार असल्याचे सांगितले. शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य व्हावे या दृष्टीने विविध शालेय उपक्रमांचे उदघाटन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील शाळांमध्ये सोयी सुविधा वाढवणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, विद्यार्थ्यांच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे, आरोग्य, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे यासाठी शालेय उपक्रमांची सुरुवात करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या अभियानासोबत दत्तक शाळा योजना, महत्वाचं उत्सव, माझी शाळा माझी परसबाग, स्वच्छता मॉनिटर टप्पा – २ या योजनांचा देखील शुभारंभ करण्यात आला. रणजित सिंह देओल यांनी आभारप्रदर्शन केले.

ML/KA/SL

5 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *