कार्यालयाच्या वेळा बदला, मध्य रेल्वेकडून कंपन्यांना विनंतीपत्र

 कार्यालयाच्या वेळा बदला, मध्य रेल्वेकडून कंपन्यांना विनंतीपत्र

मुंबई, दि. ८ : मुंबईमध्ये लोकलद्वारे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. लोकलच्या फेऱ्या कितीही वाढवल्या तरीही मोठ्या संख्येने असणाऱ्या प्रवाशांना सुविधा देताना रेल्वेवर मोठा ताण येत आहे. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीची समस्या सोडवण्यासाठी काही उपाययोजना आखल्या आहेत. त्यासाठी मध्य रेल्वेने मुंबईतील शासकीय आणि खासगी अशा ८०० पेक्षा जास्त कार्यालयांना आपल्या कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्याबाबत पत्र (Letter) पाठवले आहे.

उपनगरीय लोकल गाड्यांमधील सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीचा प्रश्न अधिकच तीव्र होत असून, यावर तोडगा काढण्यासाठी कार्यालयीन वेळांत टप्प्याटप्प्याने बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अनुषंगाने राज्य सरकारने या विषयात हस्तक्षेप करावा, अशी विनंती संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दररोज सुमारे १८१० लोकल फेऱ्या चालवल्या जात असून, त्यातून ३५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. ही सर्वात जलद आणि स्वस्त वाहतूक सेवा असल्याने त्यावरचा ताण दिवसेंदिवस वाढतो आहे.

विशेषतः सीएसएमटी ते ठाणे या मार्गावरील विविध सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील वेळांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे, सर्व लोकल गाड्यांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी निर्माण होते. गर्दीचे प्रमाण टप्प्याटप्प्याने विभागण्यासाठी आणि प्रवाशांवरील ताण कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळांमध्ये बदल करणे अत्यावश्यक असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारी कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिसेस, बँका, महामंडळे, मंडळे, महापालिका, महाविद्यालये आदी संस्थांनी आपापल्या कार्यालयीन वेळांमध्ये टप्प्याटप्प्याने बदल करण्याचा विचार करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. यामुळे लोकलवरील गर्दीचा भार विभागला जाऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल, असा विश्वास या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *