चंद्रपुरात 515 एकर परिसरात साकारणार टायगर सफारी
चंद्रपूर दि १० :–चंद्रपुरात वनविभाग हमखास व्याघ्रदर्शनाची सोय करणार आहे. चंद्रपूर शहराच्या सीमेवर 515 एकर परिसरात चंद्रपूर टायगर सफारी साकारणार आहे. यात वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह अमेरिकन, आफ्रिकन सफारी उभारली जाणार आहे. चंद्रपूर वाघांचा जिल्हा आहे. गेली 40 वर्षे उत्तम वने आणि वन्यजीव व्यवस्थापनामुळे जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे यात नियोजनबद्धता आली आहे. अशातच प्रादेशिक वनांत सहज वावरणाऱ्या वाघ आणि इतर वन्यजीवांशी मानवाशी होणारा संघर्ष ग्रामस्थांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी वाघांचे स्थलांतर केले जात आहे.
मात्र एकीकडे समस्याग्रस्त वाघ- बिबटे यांना पकडून त्यांना या टायगर सफारीत सोडत पर्यटकांना पिंजरा असलेल्या वाहनातून फिरवत सफारी घडविण्यासाठी वनविभागाने पावले उचलली आहेत. यासाठी वनविकास महामंडळाला जबाबदारी देण्यात आली आहे. याच ठिकाणी एक मोठे वन्यजीव शुश्रूषा केंद्र देखील उभारले जाणार असून देश-विदेशातील पर्यटकांना उत्तम विरंगुळा केंद्र म्हणून चंद्रपूर टायगर सफारी विकसित केली जाणार आहे.ML/ML/MS