चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक पहिल्यांदाच भाजपच्या ताब्यात…

चंद्रपूर दि २२:- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिकता आज पार पडली. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने अध्यक्षपदी रवींद्र शिंदे आणि उपाध्यक्षपदी संजय डोंगरे बिनविरोध निवडून आले. काँग्रेसने आपल्या तलवारी म्यान केल्याने बँकेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात प्रथमच भाजपचा अध्यक्ष होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला.जिल्हा बँकेच्या संचालकपदाची निवडणूक यावेळी हायप्रोफाइल झाली होती.
प्रथमच या निवडणुकीत आमदार-खासदारांनी नामांकन दाखल केले. खासदार प्रतिभा धानोरकर बिनविरोध निवडून आल्या. आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी माघार घेतली. २१ संचालक असलेल्या या बँकेत नऊ संचालक भाजपचे निवडून आले होते. मात्र, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (उबाठा) रवींद्र शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या स्वप्नांवर कुऱ्हाड कोसळली. शिंदे यांच्या समर्थकांनी भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत झाले.
मध्यंतरीच्या काळात काँग्रेसने जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. सुरवातीला भाजप आणि काँग्रेसमधील नेते एकत्र येऊन संचालकपदाच्या निवडणुकीत उतरले. तेरा बिनविरोध निवडून आले. याच काळात आमदार बंटी भांगडिया यांनी काँग्रेसच्या काही सदस्यांचा थेट भाजपात प्रवेश करून घेतला. त्यानंतर काँग्रेसचे नेते एकत्र आले. पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. एकत्र असतानाही त्यांनी आपल्याच पक्षाच्या पाडण्याचा पराक्रम केला. या सर्व बाबी भाजपच्या पदरात पडल्या. ML/ML/MS