चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर तुफानी पाऊस
रत्नागिरी , दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):अरबी समुद्रातील चक्रीवादळ दक्षिण कोकण-गोवा किनार्यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावरील नैऋत्य उत्तर-ईशान्य दिशेला सरकले असून त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर तुफानी पाऊस पडला.
चक्रीवादळ दक्षिण कोकण किनार्याजवळ पूर्वमध्य अरबी समुद्रावर, रत्नागिरी (महाराष्ट्र) च्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 40 किमी, वेंगुर्ला (महाराष्ट्र) च्या 90 किमी उत्तर-वायव्येस आणि पणजी (गोवा) च्या 140 किमी उत्तर-वायव्येस ते ईशान्येकडे सरकून आज रात्रीपर्यंत पणजी आणि रत्नागिरी दरम्यान कोकण-गोवा किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडतो आहे. अधून मधून पावसाच्या जोरदार सरी तसेच जोरदार वारा देखील वाहत आहे. समुद्रकिनारी भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे .समुद्रात उधाणाची स्थिती असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याची सूचना प्रशासनाने केलेली आहे.
तर काल रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूअसून जनजीवन मंदावले आहे. शनिवारी रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी किरकोळ नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. खेड शहरामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून भरणा नाका येथे कमरेपर्यंत पाणी आले आहे. रस्त्यालगत असलेल्या अनेक वाहनांच पावसामुळे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरले असून पावसामुळे जनजीवन मंदावले आहे. दरम्यान मुसळधार पाऊस आणि वादळी वातावरणामुळे मच्छीमारी साठी समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ML/KA/PGB 1 Oct 2023