चलेजाव आंदोलन आणि नागासाकी दिन : एकाच दिवशी दोन वेगवेगळे धडे देणाऱ्या घटना

 चलेजाव आंदोलन आणि नागासाकी दिन : एकाच दिवशी दोन वेगवेगळे धडे देणाऱ्या घटना

मुंबई, दि. 9 (राधिका अघोर) : जगाच्या अर्वाचीन इतिहासात 9 ऑगस्ट हा दिवस दोन महत्वाच्या घटनांसाठी ओळखला जातो, दोन्ही घटना पूर्ण वेगळ्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी घडल्या आहेत, तरीही त्यांच्यात एक समान सूत्र आहे, ते म्हणजे, या घटनांनी आशिया खंडाच्या इतिहासाला वेगळे वळण लागले आणि संपूर्ण जगावरही त्यांचा कायमस्वरूपी परिणाम झाला.

यातली पहिली घटना आहे, दुसऱ्या महयुद्धाच्या अखेरीस, जपानच्या नागासाकी या शहरावर अमेरिकेने केलेला अणुबॉम्ब हल्ला. दुसऱ्या महायुद्धांत, आधी सहभागी नसलेला अमेरिकाही नंतर उतरला. आणि पर्ल हार्बरच्या घटनेनंतर जपानला धडा शिकवण्यासाठी, अमेरिकेने, जपानवर, जगाच्या इतिहासातला सर्वात भीषण, अमानवी अणुबॉम्ब हल्ला केला. 6 ऑगस्ट रोजी, विमानातून, जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब फेकण्यात आला. सगळे शहर या हल्ल्यात जळून काळेठिक्कर मृतप्राय झाले. मात्र हा हल्ला पुरेसा नव्हता, म्हणून की काय, त्यानंतर तीनच दिवसांनी, 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने पुन्हा एकदा, जपानच्या नागासाकी ह्या शहरावर बॉम्बहल्ला केला. “फॅट मॅन” अशा कोड नावाने हा बॉम्ब ओळखला जातो. जवळपास 80 हजार लोक, तत्काळ या हल्ल्यात मृत्यूमुखी पडली आणि तेवढीच नंतरच्या काही महिन्यात मृत्यूला सामोरी गेली. जी माणसे वाचलीत, त्यांनी नंतरच्या उर्वरित आयुष्यात मरण यातना सोसल्या. ह्या हल्ल्यानंतर जपानने संपूर्ण शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपलं. मात्र संपूर्ण जगाला ह्या भीषण हल्ल्याचा हादरा बसला. केवळ काही लोकांच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीमुळे निरपराध माणसांचा असा नाहक बळी गेला.

ह्या दोन विध्वंसक घटनांनंतर, जगभरात आण्विक शास्त्राचा निषेध करण्यात आला. त्यानंतर शहाण्या झालेल्या काही लोकांनी एकत्र येत, भविष्यात कधीही अणूयुद्ध होऊ नये यासाठी जगाने अण्वस्त्रबंदीचा नियम आणला. मात्र जवळपास 75 वर्षे उलटून गेलीत, तरीही जगाला अण्वस्त्रमुक्त करणं अद्याप मानवाला शक्य झाले नाही.
याच दिवशी, मात्र 1942, म्हणजेच नऊ ऑगस्ट 1942 साली भारतात, ब्रिटिश सरकारविरुद्ध, चलेजाव चळवळ सुरू झाली. ब्रिटिश राजवटीचं अस्तित्व मुळापासून उपटून टाकण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली १९४२ साली भारतात शेवटचं जनआंदोलन झालं ते म्हणजे ऑगस्ट क्रांती आंदोलन.

दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान, ८ ऑगस्ट १९४२ ला अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबई इथल्या अधिवेशनात भारत छोडो आंदोलन सुरू करण्याचं निश्चित झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात 9 ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींनी मुंबईतल्या गोवालिया टँक मैदानावरुन देशातल्या ब्रिटीश सत्तेला अखेरचा इशारा देत ‘चले जाव’ चा नारा दिला आणि संपूर्ण देश पेटून उठला. त्यानंतर लगेचच महात्मा गांधींसह सर्व मोठया नेत्यांना अटक करण्यात आली. ब्रिटीशांच्या दडपशाहीला न जुमानता अरुणा असफअली यांनी गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकावला. मुंबईत सुरु झालेल्या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटले. देशभरात मोठी निदर्शनं झाली. अनेक क्रांतिकारकांनी भूमिगत होऊन या चळवळीला पुढे नेल.
ब्रिटिशाविरोधात भारतात सुरु असलेल्या स्वातंत्र्यलढ्याला गांधीजींनी लोकचळवळीचं स्वरूप दिलं.

या लोकचळवळीचा कळस म्हणजे, चलेजाव आंदोलन. सर्व प्रमुख नेते तुरुंगात असतांना जनतेनंच हे आंदोलन पुढे नेलं. भर महायुद्धाच्या काळात सर्व स्तरातल्या भारतीयांनी एकत्र येऊन या क्रांतीदिनानंतर ब्रिटीश सत्तेचा पाया खिळखिळा केला. खरं तर हे आंदोलन आणि त्यानंतर मुंबईत झालेलं नौदलाचं बंड, भारतात स्वातंत्र्यसूर्याच्या उदयाची नांदी देणारं ठरलं.
सुरुवातीला म्हटलं तसं, एकाच दिवशी झालेल्या ह्या दोन घटना, मानवाला मोठा संदेश देणाऱ्या आहेत. हिरोशिमा- नागासाकीवरचा हल्ला, माणसाची युद्धखोरी आणि अस्त्रवापराचे भीषण परिणाम दाखवणारी आणि हिंसा हे काशाचेच उत्तर नाही, हे सिद्ध करणारी आहे तर भारतात घडलेली दुसरी घटना, अहिंसक लोकचळवळीची ताकद दर्शवणारी आहे. या दोन्ही घटना आशिया खंडाचे वर्तमान बदलणाऱ्या आणि भविष्यालाही नवा आकार देणाऱ्या ठरल्या.

ML/ML/PGB
9 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *