केंद्र सरकारने बंद केली मॅट्रिकपूर्व शिष्यवृती सुरू करावी
मुंबई दि.29(एम एमसी न्यूज नेटवर्क): अल्पसंख्याक घटकांतील विद्यार्थ्यांसाठीची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आणि मौलाना आझाद शिष्यवृत्ती केंद्र सरकारने बंद केली आहे.या घटनेचा आम्ही निषेध करीत असून ती पूर्वत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी 5 जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानात मूक आंदोलन करण्यात येईल,अशी माहिती शिष्यवृत्ती जनआंदोलन समितीचे अध्यक्ष डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी आज दिली. central government should restart pre-matriculation scholarship
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुणगेकर म्हणाले की,भारत सरकारने या वर्षांपासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसीएस आणि अल्पसंख्याकांना दिली जाणारी इयत्ता पहिली ते आठवी पर्यतची शिष्यवृत्ती रद्द केली आहे. तसेच सच्चर समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप (MANF) ही अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ही, या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा निर्णयही केंद्राने घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि ही शिष्यवृत्ती त्वरित पूर्ववत करण्याची मागणी करतो.
2004 ते 2009 या काळात मी नियोजन आयोगाचा सदस्य असताना,पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीए च्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विभागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी 2006 साली अल्पसंख्याकांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली.
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांनासाठी ही मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना होती.३० टक्के शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव ठेवण्यात आली.दरवर्षी 30 लाख विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जात असे. मात्र ही शिष्यवृत्ती बंद केल्याने विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण वाढेल अशी भीतीही मुणगेकर यांनी व्यक्त केली .
प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती तसेच मौलाना आझाद फेलोशिप समाजातील या सर्व असुरक्षित घटकांना त्वरित पुनर्संचयित कराव्यात आणि त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी येत्या 5 जानेवारी रोजी आझाद मैदानात मूक आंदोलन करणार आहोत. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका स्तरावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करून 1 लाख लोकांच्या सह्याची मोहीम राबवणार आहोत. जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यत हे आंदोलन सुरूच राहणार आहे असे ही मुणगेकर यांनी सांगितले.
SW/KA/SL
29 Dec. 2022