‘शिवाजी वाचन मंदिर’ वाचनालयाचा शतक महोत्सवीवर्ष सांगता सोहळा
सिंधुदुर्ग, दि. ११ : मालवण मधील सुप्रसिद्ध ‘शिवाजी वाचन मंदिर’ या वाचनालयाचा शतक महोत्सवी वर्ष सांगता सोहळा नुकताच पार पडला. या शतक महोत्सवी वर्षात दरमहा वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बहुजन समाजाकरिता अहोरात्र झटणारे त्याकाळातील मुंबईमधील सुप्रसिध्द वकील दिवंगत जगन्नाथ शिवाजी सावंत यांच्या प्रेरणा आणि पुढाकारातून ,शिक्षणाचा प्रसार व्हावा या हेतूने वाचनालय सुरु झाले.
ज्या काळात हा उपक्रम मालवण येथे सुरु झाला तो काळ अत्यंत खडतर होता देश पारतंत्र्यात होता. बऱ्याच प्रमाणात समाजामध्ये, गावात शिक्षणाचा अभाव होता. त्या काळात पुस्तकांच्या माध्यमातून चांगले विचार कसे लोकांपर्यंत खास करून बहुजन समाजापर्यंत पोहोचतील,शिक्षणाचा प्रसार कसा होईल हा विचार मनात ठेऊन जगन्नाथ सावंत यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या वाचनालयाची सुरुवात केली होती.
शंभर वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झाले असून आजमितीला वाचनालयात अठरा हजाराहून अधिक पुस्तके वाचकप्रेमींसाठी उपलब्ध असून संगणक युगात देखील वाचनसंस्कृती वाढविण्याचे काम अविरतपणे सुरु आहे.
१ जानेवारी २०२३ रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी हजारे सर आणि सामाजिक कार्यकर्त्या रेणुका दांडेकर यांच्या उपस्थितीत हा सांगता सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीधर काळे यांनी केले होते. या कार्क्रमाला सर्व पदाधिकारी, वाचकप्रेमी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ML/KA/SL
11 Jan. 2023