केतकीबनाचा विध्वंस ठरतोस विनाशकारी वादळास कारण

दापोली, पाडले दि. ३१ ( प्रबोध लिमये ) : पाच वर्षांपूर्वी झालेल्या निसर्ग निसर्गचक्रीवादळातून कोकण किनारट्टीवरील शेतकरी नुकतेच सावरू लागले आहेत. मात्र दापोली तालुक्यातील आडे,पाडले, केळशी, आंजर्ले किनारपट्टीवर शेतकरी बांधवांवर आता दरवर्षीच अल्पकालिन परंतु अत्यंत विनाशकारी वादळाची टांगती तलवार आहे. चार दिवसांपूर्वी काही मिनिटांसाठीच झालेल्या भयंकर वादळाने पाडले गावातील अनेकांच्या घरांचे छप्पर उडून गेले आहे तसेच अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. दरवर्षी मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या अशा वादळामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वित्तहानीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या समुद्र किनाऱ्यांवर पूर्वी घनदाट केवड्याची बने होती. त्यामुळे पावसाळ्यातील वादळी वाऱ्यापासून गावाचे नैसर्गिकरित्याच रक्षण होत असे. मात्र पर्यटकांसाठी Sea View रिसॉर्ट उभारण्याच्या हव्यासातून या केतकीबनाची अपरिमित हानी झाली आहे. त्यामुळे दरवर्षीच गावाला वादळांना सामोरे जावे लागत आहे.
सध्या आपल्या समुद्रकिनाऱ्यालगत केवड्याच्या बनांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. यामुळेच कदाचित विनाशकारी वादळांची तीव्रता वाढली असावी. केतकीचं (केवडा) बन जर पुन्हा पुनर्संचयित (restore) केलं, तर भविष्यातील या नैसर्गिक संकटांचा धोका निश्चितच कमी होऊ शकतो, असं मत स्थानिक ज्येष्ठ शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
पूर्वीचं निसर्गसंपन्न किनाऱ्याचं चित्र:
समुद्रकिनाऱ्यांवर केवड्याचं बेट, नारळ व सुपारीच्या बागा होत्या.
केतकीसारखी झाडं पाण्याचा वेग थोपवण्याचं काम करत होती.
या झाडांमुळे वाऱ्याचा जोर कमी होऊन वस्तीपर्यंत पाणी पोहोचण्यापासून अटकाव होत असे.
आजची परिस्थिती:
किनाऱ्यालगतचे बहुतांश भाग आता सी व्ह्यू रिसॉर्ट्स साठी वापरले जात आहेत.
पर्यटन निवासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे.
केवडा, सुरू आणि नारळ या झाडांची बेसुमार तोड करून, पर्यावरणाचा नैसर्गिक संरक्षक कवच काढून टाकण्यात आलं.
परिणामी समुद्राचं पाणी वाडी-वस्तीत घुसू लागलं आहे.
हे पाणी अडवण्यासाठी आता बंधारे बांधले जात आहेत, पण वादळं व वाऱ्यांवर नियंत्रण ठेवणं शक्य नाही.
बंधाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर डोंगर फोडले जात आहेत, ज्याचा आणखी विपरित परिणाम पर्यावरणावर होत आहे.
बिल्डर लॉबीचा हस्तक्षेप:
श्रीमंत बिल्डर लॉबीने स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यल्प दरात विकत घेऊन, त्या ठिकाणी सुखवस्तू जीवनशैलीचे प्रकल्प सुरू केले आहेत. निसर्गाच्या मुळावर उठून होणाऱ्या या घडामोडींकडे वनविभाग आणि शासनाचे लक्ष जाणं अत्यावश्यक आहे.
शासन किंवा वनविभागाने विशेष लक्ष घालून, केवड्याचं बेट आणि केतकीचं बन पुन्हा उभे केले तर यामुळे पर्यावरणीय समतोल राखता येईल, वस्ती व शेती वाचू शकेल आणि भविष्यातील वादळांचा सामना करणं अधिक सुलभ होईल, अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.