देशातील पहिले आदिवासी कार्बन न्युट्रल गाव …

 देशातील पहिले आदिवासी कार्बन न्युट्रल गाव …

ठाणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ भिवंडी लोकसभा मतदारसंघात १ लाख ७५ हजार शेतकरी घेत आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.

भिवंडी मतदारसंघात १२१ आदिवासी गावांचा आदर्श गावे म्हणून, तर देशातील पहिले कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव भिवंडीत उभारले जात असल्याची माहिती त्यांनी दिली, आज भिवंडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नऊ वर्षांत गरीबांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले असून, सामान्य माणसाला सुखी ठेवण्याचा एकमेव उद्देश ठेवण्यात आला. नियोजनबद्ध लोकहिताच्या वेगवान विकासकामांमुळे सामान्य माणसाचे जीवन आनंदी होत आहे. जगभरात भारताचा लौकिक वाढला असून, देशाची सुवर्णयुगाकडे वाटचाल सुरू आहे, असं पाटील यांनी सांगितलं.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग,आठ पदरी माजिवडा-वडपे बायपास, शहापूर-खोपोली महामार्ग आदींसह अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच भिवंडी लोकसभा मतदारसंघात विकासाची नवी पहाट उगविली, अशी भावना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ९ वर्षांत केलेले कार्य
विविध कामांची माहिती पाटील यांनी दिली. या वेळी भाजपाचे आमदार महेश चौगुले, शहराध्यक्ष संतोष शेट्टी आदींची उपस्थिती होती.कोरोना महामारीपासून ८० कोटी नागरिकांना मोफत अन्न-धान्य, आयुष्मान भारत योजनेतून पाच कोटी रुग्णांवर पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार, कोरोनावर २२० कोटी मोफत डोस, साडेतीन कोटी कुटुंबांना पक्के घर, ११ कोटी ७२ लाख शौचालये, १२ कोटी घरात नळाने पाणी, जनऔषधी केंद्रांवर स्वस्तात औषधे, १ रुपयात सॅनिटरी नॅपकिन, साडेनऊ कोटी भगिनींना मोफत गॅस जोडणी, प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक ६ हजार रुपये, खतांच्या किंमती कायम आदी महत्वपूर्ण काम करून गरीबांसाठी सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी कार्यरत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सिद्ध केले.

केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयात गरीबांच्या हिताचा व कल्याणाचा विचार केला गेला, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

ML/KA/PGB
4 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *