कर्करोग मृत्यूघंटा नाही, तर जीवन जगण्याची इच्छा वाढवणारा आजार, सकारात्मक मनोवृत्ती हीच कर्करोगाची जडीबुटी

 कर्करोग मृत्यूघंटा नाही, तर जीवन जगण्याची इच्छा वाढवणारा आजार, सकारात्मक मनोवृत्ती हीच कर्करोगाची जडीबुटी

राधिका अघोर

कोणे एके काळी फक्त श्रीमंत व्यक्ती किंवा हिंदी सिनेमात असलेलं कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा आजार आज भारतात घरोघरी पोहोचला आहे, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वयोगट, गरीब श्रीमंत, कुठल्याही स्तरातल्या व्यक्तींमधे आजकाल कर्करोगाचे प्रमाण आढळते. या विषयीची आकडेवारी अत्यंत भयावह आहे आणि दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षात, कर्करोगावर प्रभावी किंवा हुकुमी उपाययोजना करण्यात आपल्याला यश आले नाही. म्हणूनच, कर्करोग होऊच नये यासाठी प्रतिबंधक उपाय करणे, त्याबद्दल जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. हेच लक्षात घेऊन, 2014 साली सरकारने 7 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली. या दिवसानिमित्त राबवलेल्या विशेष मोहिमेतून, कर्करोगाची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध यावर माहिती दिली जाते. विविध आरोग्य विष्यक संस्था, संघटना, रुग्णालये याबद्दल जनजागृती करतात. यात चर्चासत्रे, तपासणी शिबिरे असे उपक्रम असतात.

कर्करोग म्हणजे, शरिरात कुठेतरी कॅन्सरच्या पेशींची अनियंत्रित वाढ होणे आणि त्यामुळे एखाद्या अवयवाला कर्करोगाची लागण लागणे. जगभरात आणि भारतातही त्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. भारतापुरते सांगायचे झाल्यास, भारतात सतत किमान 20 ते 25 कर्करोग ग्रस्त आहेत. दरवर्षी सुमारे 7 लाख नवे रुग्ण आढळतात. स्तनांचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग, आतडी, पोटाचा , यकृत आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग अशा कर्करोगांचे मोठं प्रमाण आहे भारतात. त्याशिवाय, मुखाच्या कर्करोगाचे प्रमाणही अधिक आहे. आसाम सारख्या छोट्या राज्यात कर्करोगाचे इतके प्रचंड प्रमाण आहे, की हे राज्य कॅन्सर कॅपिटल म्हणून ओळखले जाते. आणि याचे मुख्य कारण म्हणजे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन. कर्करोगाच्या मृत्यूपैकी 34 टक्के मृत्यू केवळ मुखाच्या किंवा घशाच्या कॅन्सरने होतात.

आज वाढलेले आयुष्य आणि बदलती जीवनशैली यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढतेच आहे. येत्या काही काळात ते प्रमाण तिपटीने वाढेल असा अंदाज आहे. त्यातही अत्यंत चिंतेची गोष्ट म्हणजे कर्करोगाचे निदान होते त्यावेळी त्यावेळी अनेक रुग्ण तो आजार बरा न होण्याच्या स्थितीत गेले असतात. आणि त्यावेळी शस्त्रक्रिया, कर्करोगाच्या पेशी जाळून टाकणारी किमोथेरपी किंवा रेडिएशन अशा उपचारांनी ही रुग्ण बरा होत नाही. हे उपचार रुग्णाचे शरीर पिळून काढणारे असतात. शिवाय खूप खर्चिकही असतात. त्यामुळे, कर्करोगाशी लढा द्यायचा तर हा आजार स्वतः पर्यंत पोहचू ना देणे हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन पूर्ण बंद करणे, आपली जीवनशैली आणि आहार उत्तम सकस ठेवणे, बाहेरचे रस्त्यावरचे, अस्वच्छ वातावरणातले पदार्थ खाणे टाळणे, शिळे, फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ टाळणे, आहारात भाज्या, फळे, विशेषतः क जीवनसत्व असलेली फळे यांचा अधिकाधिक समावेश करणे, नियमित व्यायाम करणे, अतिनील किरणांपासून स्वतःचा बचाव करणे, अशा उपाययोजना करता येतात.

शिवाय, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापसून संरक्षण करणारी लस ही आज उपलब्ध आहे. तसेच कर्करोगाची लक्षणे, म्हणजे शरीरात कुठे गाठ येणे, अत्यंत थकवा, वजन अचानक कमी होणे, सातत्याने ताप येणे, अशी सगळी लक्षणे दिसताच, लवकर तपासणी करायला हवी. आज मुंबईत टाटा कॅन्सर रुग्णालयात कर्करुग्णांची दिसणारी प्रचंड गर्दी, या आजारांमुळे झालेल्या मृत्यू मुळे उद्ध्वस्त होणारी घरे, होणारा खर्च हे सगळे पाहता, या आजारासाठी खूप मोठ्या संख्येने रुग्णालये, चिकित्सा केंद्रे उभारली जायला हवीत. आजार बरा होण्यासाठी लागणारा दीर्घ कालावधी बघता, असे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची राहण्याची सोय होईल, असे निवारे असायला हवेत. त्याबद्दल अधिकाधिक जनजागृती व्हायला हवी. कर्करोगाची भीषणता लोकांच्या समोर यायला हवी, म्हणजे त्यातून या आजाराला आमंत्रण देणाऱ्या गोष्टी टाळता येतील. आणखी एक म्हणजे, हा आजार झाल्यानंतर खचून किंवा घाबरून न जाता, त्याचा सामना शक्य तितक्या सकारात्मकतेने करायला हवा. अशा सगळ्या एकत्रित उपायातून कर्करोगाच्या राक्षसाचा आपण सामना करू शकतो, आपण आपले मन तेवढे भक्कम करायला हवे. Cancer is not a death sentence, but rather it is a life sentence; it pushes one to live.” – Marcia McGreevey.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *