चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायींसाठी त्रासदायक ठरणारा मेगा ब्लॉक रद्द करा

मुंबई, दि.12(एम एमसी न्यूज नेटवर्क) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी देशभरातून दरवर्षी लाखो लोक चैत्यभूमीवर येत असतात याची कल्पना असतानाही पश्चिम रेल्वे प्रशासनाने १२ व १३ तारखेला मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे मुंबईत येणाऱ्या भीम अनुयायींना नाहक त्रास होणार आहे, त्यामुळे पश्चिम मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी चैत्यभूमी येथे दाखल होणार आहेत. तसेच यादिवशी बाबासाहेबांचा समता व न्यायाचा विचार घेऊन मुंबईच्या अनेक भागांत विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात, त्यात मोठ्या प्रमाणावर भीम सैनिक आवर्जून सहभागी होतात. पण रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे त्यांना त्रास होणार आहे. या मेगाब्लॉकमुळे सुमारे ३३४ लोकल सेवा रद्द होणार आहेत व इतर अनेक सेवा शॉर्ट टर्मिनेट कराव्या लागणार आहेत, हे अन्यायकारक आहे. मेगाब्लॉकमुळे भीम अनुयायींसह इतर प्रवाशांचीही मोठी गैरसोय होणार असून अनेकांना महामानवास अभिवादन करणे अवघड होणार आहे, याची तात्काळ दखल घेऊन मेगा ब्लॉक रद्द करावा असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
SW/ML/SL
12 April 2025