कोलकाता बलात्कार प्रकरणातील दोषी संजयला जन्मठेप
कोलकाता, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या संजय रॉयला आज १६४ दिवसांनंतर सियालदाह न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने म्हटले, ‘हा दुर्मिळातील दुर्मिळ खटला नाही.’ त्यामुळे मृत्युदंड देता येणार नाही.
स्थानिक न्यायालयाने राज्या सरकारला पीडितेच्या कुटुंबाला १७ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले, परंतु कुटुंबाने ते स्वीकारण्यास नकार दिला. दुपारी १२:३० वाजता न्यायालयाने दोषी संजय, सीबीआय आणि पीडितेच्या कुटुंबाच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकला. न्यायाधीश अनिर्बान दास यांनी संजयला सांगितले की, तुम्ही कोणत्या गुन्ह्यांसाठी दोषी आहात हे सांगितले गेले आहे. न्यायालयाने संजयला बोलण्याची संधी दिली होती.
यापूर्वी, १८ जानेवारी रोजी न्यायालयाने संजयला दोषी ठरवले होते परंतु शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता. संजयच्या शिक्षेसाठी १६० पानांचा निकाल लिहिण्यात आला आहे. कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज-रुग्णालयात ८-९ ऑगस्टच्या रात्री एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. संजय रॉयला १० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही तपास केला असता तर आरोपीला फाशीची शिक्षा झाली असती असे त्या म्हणाल्या आहेत. हे प्रकरण कोलकाता पोलिसांकडून जबरदस्तीने काढून घेत सीबीआयकडे देण्यात आले. जर राज्य पोलिसांकडे तपास असता तर फाशीची शिक्षा निश्चित झाली असती, असे त्यांनी सांगितले.
SL/ML/SL
20 Jan. 2025