मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरलाच…

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर येत्या रविवारी नागपूर येथे होणार असून या शनिवारी तो मुंबईत होण्याची चर्चा होती. मात्र यावेळी तो पहिल्यांदाच नागपूर येथे होणार आहे. या विस्तारात किमान 30 ते 35 मंत्री शपथ घेतील अशी शक्यता आहे .
5 डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानात एका भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडला होता त्यानंतर लगेचच 16 तारखेपासून नागपूर येथील अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवरती सुरुवातीला 12 किंवा 14 अशा तारखांना मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा होती. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर मधील राजभवनात हा विस्तार होईल असे आता जवळपास निश्चित झाले आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारात साधारणपणे 21 मंत्री भाजपाचे, 11 मंत्री शिवसेनेचे आणि 8 मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील अशी अपेक्षा आहे. भाजपाच्या मंत्र्यांमध्ये जुन्या आणि नवीन अशा मंत्र्यांचा समावेश असेल असेही जवळपास निश्चित आहे. याआधी काही जुन्या चेहऱ्याना पुन्हा संधी मिळणार नाही असा एक मतप्रवाह होता. मात्र इतर पक्षांकडे जुने चेहरे, त्यासोबतच नोकरशाही वरती अंकुश ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस वगळता अन्य वरिष्ठ नेतेही असावेत असाही एक मतप्रवाह भाजपामध्ये आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे देखील मंत्रिमंडळात असतील असे जवळपास निश्चित झाले आहे.
याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल, डॉ संजय कुटे, नाशिक मधील सीमा हिरे हे चेहरे देखील मंत्रिमंडळात असू शकतात. ठाणे जिल्ह्यातील गणेश नाईक, किसन कथोरे यांची नावे देखील चर्चेत आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी सात जण कॅबिनेट तर पाच जण राज्यमंत्री असू शकतात त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पाच कॅबिनेट तर चार राज्यमंत्री असू शकतात.
उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अपेक्षित असतानाच आज सायंकाळपर्यंत कोणत्याही आमदाराला शपथ घेण्यासाठी अद्याप निरोप गेलेले नाहीत त्यामुळे हा शपथविधी उद्या होणार नाही हे निश्चित आहे.
ML/ML/SL
13 Dec. 2024