बुलडाणा जिल्ह्यात १७७ जलाशय होणार गाळमुक्त
बुलडाणा, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भात मोठ्या संख्येने जलाशय आहेत मात्र वर्षानुवर्षे यांतील गाळ न काढल्याने हे जलाशय पूर्ण क्षमतेने भरू शकत नाहीत. यामुळे पाणी पातळीत घट झालेली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी जलाशयांतील गाळ काढून जलसाठा वाढविण्याच्या दृष्टीने बुलडाणा जिल्ह्यातील विशेष प्रयत्न सुरू आहेत. या वर्षी जिल्ह्यातील १७७ जलाशये गाळमुक्त करण्याचा उपक्रम प्रशासनाने हातात घेतला असून, शेतकऱ्यांना यातील गाळ मोफत मिळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या जलसंधारण आणि राज्य शासनाच्या मृद् व जलसंधारण विभागाच्या मालकीच्या १७७ जलाशयांमधील गाळ काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातून हा गाळ काढण्यात येत आहे. शेतामध्ये गाळ टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. यासाठी शेतकऱ्यांना गाळ मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना गाळ काढण्यासाठी कोणत्याही यंत्रणेला शुल्क देण्याची गरज नाही. हा गाळ शेतीच्या उपयोगासाठी मोफत उपलब्ध असणार आहे.
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ हा उपक्रम ग्रामपंचायतीसह शेतीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे, असे प्रशासन वारंवार आवाहन करीत आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी जेमतेम दीड महिन्यांचा कालावधी राहिला आहे. या कालावधीत धरणातील गाळ काढण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे. पावसाळ्यात धरणातील गाळ काढता येणे शक्य नसल्याने जलसंधारण विभागाने या कामात अटकाव करू नये, असे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत. गाळ काढल्यामुळे तलावातील पाणी साठवण क्षमता वाढणार आहे.
SL/ ML/SL
26 April 2024