तालिबानमध्ये घरांना खिडक्या बांधण्यास बंदी
काबूल, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अफगाणिस्तानमधील महिलांचे आयुष्य तालिबानी राजवटीत दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालले आहे. अतिरेक्यांकडून निघणाऱ्या जाचक फतव्यांमुळे महिलांना श्वास घेणेही मुश्कील होणार आहे. कारण आता तालिबानकडून अफगाणिस्तानमधील महिलांसाठी नवा फतवा जारी करण्यात आला आहे. तालिबानचा नेता हिबतुल्लाह अखुंदजादाने याबाबत आदेश दिले आहेत. नव्या फतव्यानुसार नव्यानं बांधण्यात येणाऱ्या इमारतीला अशी कोणतीही खिडकी नसावी ज्या खिडकीमधून घरातील महिला दिसतील, किंवा त्या खिडकीमध्ये येऊन महिलांना बसता येईल. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला घरातील महिला दिसता कामा नये, असा आदेश तालिबानचा नेता अखुंदजादाने दिला आहे.
हा आदेश फक्त नव्या इमारतींनाच लागू नसणार आहे, तर देशात ज्या जुन्या इमारती आहेत त्यांच्यासाठी देखील हा नियम लागू करण्यात आला आहे. ज्या इमारतींना अशा खिडक्या आहेत, त्या झाकून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वंयपाक घराला खिडकी ठेवू नका, अशा खिडक्यांमधून घरातील महिला सहज बाहेरच्या लोकांना दिसू शकतात असं या आदेशात म्हटलं आहे. कुठल्याही घराला अशा खिडक्या असतील तर त्या झाकून टाकण्याची जबाबदारी ही त्या घराच्या मालकावर असणार आहे.
नव्या इमारती बनवताना त्या इमारतीला अशाप्रकारे खिडक्या बनवू नयेत, इमारतीच्या खिडक्या कोणत्या दिशेनं आहेत, आणि त्यातून घरातील महिला दिसतात का? हे तपासण्याची जबाबदारी तेथील नगपालिकेंच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. जर असं एखादं घर आढळल्यास त्याची परवानगी रद्द करावी असे आदेश देखील तालीबान्यांकडून देण्यात आले आहेत.
या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाण महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास आणि चेहरा दाखवण्यास बंदी घालण्यात आली होती. यासोबतच महिलांनी अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असेही सांगण्यात आले. याशिवाय तालिबानने महिलांना खेळात सहभागी होण्यासही बंदी घातली आहे. 2021 मध्ये सत्तापालट केल्यानंतर तालिबानने सरकारचा ताबा घेतला. यानंतर ते म्हणाले होते की, देशात शरिया कायदा लागू केला जाईल. वास्तविक, इस्लामला मानणाऱ्या लोकांसाठी शरिया ही एक कायदेशीर व्यवस्था आहे. अनेक इस्लामिक देशांमध्ये याचा वापर केला जातो.
SL/ML/SL
30 Dec. 2024