शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देणारा चार स्तंभांवर आधारित राज्याचा अर्थसंकल्प सादर

 शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देणारा चार स्तंभांवर आधारित राज्याचा अर्थसंकल्प सादर

मुंबई दि ६ : राज्यातील सुमारे 30 लाख शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत ची कर्जमाफी देणारा आणि चार स्तंभांतर्गत 16 उपक्षेत्र निश्चित करणारा तुटीचा अर्थसंकल्प आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केला. यात चाळीस हजार 552 कोटी रुपयांची महसुली तूट दर्शवण्यात आली आहे.

तब्बल 11 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित करणारा हा अर्थसंकल्प आहे, असे सांगत महात्मा फुले, संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, संत तुकाराम महाराज आदी मान्यवरांच्यासाठी अनेक योजना जाहीर करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक आणि त्यांच्या नावे गतिमान सुशासन नागरी पुरस्कार देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केला.

मुख्यमंत्र्यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात प्रगतिशील, शाश्वत सर्वसमावेशक आणि सुशासन असे चार स्तंभ निश्चित केले असून त्यात 16 उपक्षेत्रे नक्की करण्यात आली आहेत. हा अर्थसंकल्प चारसूत्री असून विकसित महाराष्ट्राचे सूत्र यात गुंफण्यात आले आहे असे मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. कृषी क्षेत्रातील दहा ते पंधरा पिकांसाठी साखळी योजना जाहीर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना हवामान आणि इतर सल्ल्यांसाठी वसुधा ही आवाजावर आधारित सेवा सुरू करण्यात येणार असून कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यातील पशुधनासाठी नवीन योजना जाहीर करण्यात येणार असून मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना देखील आणण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.

राज्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या किमान 1000 लोकसंख्येच्या सर्व गावांना काँक्रीटच्या रस्त्याने जोडण्यात येणार असून हे काम आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने करण्यात येणार आहे, राज्यात सेवा क्षेत्रासाठी 400 क्षमता केंद्र नव्याने सुरू करण्यात येणार असून अनेक पर्यटन विकासाची काम हाती घेण्यात येणार आहेत. याखेरीज अनेक नव्या मेट्रो मार्गांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. पालघर जिल्ह्यात सातपाटी येथे आधुनिक मत्स्य बंदर उभारण्यात येणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाख मर्यादेपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या खातेधारकांसाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन लाभ म्हणून देण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली. लाडकी बहीण योजना सुरूच राहील त्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय राज्यात आणखीन 25 लाख बहिणींना लखपती दीदी बनवले जाईल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सुशासन गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्यात आणखीन 75 हजार नवीन पदभरती करण्यात येईल असेही मुख्यमंत्री यावेळी मिळाले.

मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेत सुमारे 30 लाख शेतकरी लाभान्वीत होणार असून वीस लाख नियमित कर्ज भरणारे शेतकरी देखील लाभान्वीत होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. आधार कार्ड सलग्न असणाऱ्या एग्रीस्टॅक खाते नोंदीमुळे खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल. आपली कर्जमाफी ही बँकांसाठी नाही असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. मागच्या वेळी 20,000 कोटी कर्जमाफीसाठी तर 15,000 कोटी नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी देण्यात आले होते. यावेळी देखील त्याच रकमेच्या आसपास खर्च अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात यावेळी जीएसटी मुळे पाच लाख साठ हजार 964 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षामध्ये सहा लाख 1 हजार 489 कोटी इतके उत्पन्न मिळणार आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात 40,552 कोटींची महसुली तूट दाखवण्यात आली असून राजकोषीय तूट एक लाख 50 हजार 491 कोटी इतकी आहे. मात्र या दोन्ही तूट आर्थिक शिस्तीच्या मर्यादेतच आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *