बीएसयुपी सदनिका धारकांसाठी १०० रुपयांत रजिस्ट्रेशन..
ठाणे दि १९ : जेएनएनयूआरएम आणि बीएसयूपी अंतर्गत सर्वसामान्य सदनिकाधारकांना अवघ्या १०० रुपयांत रजिस्ट्रेशन करण्याची सवलत देण्यात आली असून एक टक्का मुद्रांक शुल्कात देखील सवलत देण्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.
जेएनएनयूआरएम आणि बीएसयूपी अंतर्गत ठाणे विभागात उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये प्रकल्पग्रस्त नागरिकांना सदनिका देण्यात आलेल्या असून यात ६३४३ कुटुंबांचा समावेश आहे. ही कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मजूर, कामगार अशा सर्वसामान्य लोकांची असल्याने त्यांना मुद्रांक शुल्क आणि नोंदणी करण्यासाठी लागणारा ५० हजार ते एक लाख ३४ हजार रुपयांपर्यंतचा खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे या सदनिका त्यांच्या नावे होण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती.
याबाबत रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. केळकर यांनी याबाबत राज्य शासन आणि महापालिका प्रशासन यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करत या कुटुंबांना दिलासा देण्याची मागणी केली होती.
अखेर राज्य सरकारने या कुटुंबांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून फक्त १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर नोंदणी आणि एक टक्का मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली आहे. त्याबाबतचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला असून यामुळे बीएसयुपी इमारतींमधील हजारो कुटुंबांचा सदनिका नावे करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत बोलताना आ. केळकर म्हणाले, याबाबत मी पाच पत्रे दिली असून राज्य शासन आणि महापालिका प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. राज्य सरकारने याबाबतचा अध्यादेश काढल्याने बीएसयुपी इमारतींमधील सुमारे ५० हजार रहिवाशांना त्याचा फायदा झाला आहे, असे सांगत केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.ML/ML/MS