महत्त्वाचे तांत्रिक टप्पे गाठत BSNL चे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण
नवी दिल्ली, दि. ३ : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या स्थापनेच्या २५ वर्षांचा गौरवशाली प्रवास साजरा करत रौप्य महोत्सवी वर्षात प्रवेश केला आहे. १ ऑक्टोबर २००० रोजी स्थापन झालेल्या BSNL ने गेल्या पंचवीस वर्षांत भारताच्या शहरी आणि ग्रामीण भागांना डिजिटल पायाभूत सुविधांनी जोडण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. देशाच्या डिजिटल प्रगती आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत BSNL ने दूरसंचार क्षेत्रात अनेक क्रांतिकारी टप्पे गाठले आहेत.
२७ सप्टेंबर २०२५ रोजी ओडिशामधून भारताचे माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते BSNL च्या स्वदेशी ४जी नेटवर्कचे उद्घाटन करण्यात आले. ही स्वदेशी ४जी सेवा पूर्णतः देशात विकसित केलेल्या कोअर आणि उपकरणांवर आधारित असून, भारताच्या तंत्रज्ञान स्वावलंबनाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. या उपक्रमामुळे भविष्यातील प्रगत तंत्रज्ञानाच्या जलद विस्ताराचा पाया रचला गेला आहे.
BSNL ने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईमध्ये स्वदेशी ४जी सेवांचा सॉफ्ट लॉन्च केला. यामुळे मुंबईतील लाखो ग्राहकांना उच्च-गतीचा मोबाइल ब्रॉडबँड, विस्तृत कव्हरेज आणि डिजिटल सक्षमीकरणाचा लाभ मिळाला. ही सेवा पूर्णतः स्वदेशी दूरसंचार प्लॅटफॉर्मवर आधारित असून, देशाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल आहे.
नवीन तंत्रज्ञानाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत BSNL ने मुंबईमध्ये VoWiFi (Voice over Wi-Fi) सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना अशा ठिकाणीही स्पष्ट आणि अखंड कॉलिंगचा अनुभव मिळतो जिथे मोबाइल सिग्नल कमकुवत असतो. कोणत्याही Wi-Fi नेटवर्कवर ही सेवा वापरता येते, ज्यामुळे डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि ग्राहक सोयीसाठी ही एक क्रांतिकारी सुविधा ठरली आहे.
तसेच, १ ऑक्टोबर २०२५ पासून महाराष्ट्रात BSNL ने e-SIM सेवा सुरू केली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना सुलभ अॅक्टिव्हेशन, डिव्हाइस स्विचिंगची सोय आणि स्मार्टफोन तसेच IoT उपकरणांसाठी अधिक सुलभ डिजिटल अनुभव मिळतो.
BSNL ने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षात ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेशी बांधिलकी व्यक्त करत नेटवर्कचे आधुनिकीकरण, ग्रामीण-शहरी कनेक्टिव्हिटीचा विस्तार आणि नवोन्मेषी व परवडणाऱ्या सेवा देण्याचे वचन दिले आहे. हे उपक्रम BSNL च्या भारताच्या डिजिटल पायाभूत रचनेचा आधारस्तंभ बनण्याच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहेत.
SL/ML/SL
3 Oct. 2025