बहिण भावाने मागितले बीड जिल्हा बँकेला ३०० कोटींचे सॉफ्ट लोन…
![बहिण भावाने मागितले बीड जिल्हा बँकेला ३०० कोटींचे सॉफ्ट लोन…](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2025/01/DPA.jpg)
बीड, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला कृषी आणि अकृषी असा दोन्ही प्रकारचा पतपुरवठा करून शेतकरी वर्गाला दिलासा देता यावा, यासाठी बीड जिल्हा बँकेस बुलडाणा जिल्ह्याच्या धर्तीवर राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून ३०० कोटींचे सॉफ्ट लोन सवलतीच्या व्याज दराने उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
व्याजात सवलत देता येत नसल्यास विशेष बाब म्हणून अर्थ खात्याने अर्धे व्याज भरून बँकेला सहकार्य करावे, अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात झालेल्या बैठकीत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे केली आहे. तर या मागणीस मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील समर्थन दिले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थ – नियोजन मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज नाशिक आणि बीड जिल्हा मध्यवर्ती बँकांना मदत करण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे, नरहरी झिरवळ यांसह संबंधित विभगांचे अधिकारी उपस्थित होते.
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून २०१९ पासून चांगले काम करून दाखवले. बँकेचा घासरलेला दर्जा आणि वसुलीमध्ये सुधारणा करून ब दर्जा मिळवला. आता बँकेच्या कृषी तसेच अकृषी कर्जांच्या पुरवठ्यासाठी बाधा येऊ नये, यासाठी ३०० कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन देण्यात यावे, अशी मागणी यावेळी एकमुखाने करण्यात आली.
ML/ML/SL
29 Jan. 2025