ब्रिटिश विदुषी फ्रान्सिस्का ओरसिनींना भारतात प्रवेश बंदी
नवी दिल्ली, दि. २४ : ब्रिटनमधील सुप्रसिद्ध हिंदी साहित्य अभ्यासक आणि लंडन विद्यापीठाच्या SOAS (School of Oriental and African Studies) विभागातील प्राध्यापिका एमेरिटा फ्रान्सेस्का ऑर्सिनी यांना भारतात प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्या २० ऑक्टोबर २०२५ रोजी हाँगकाँगहून दिल्ली विमानतळावर आल्या होत्या, मात्र त्याच दिवशी त्यांना परत पाठवण्यात आले. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑर्सिनी यांना व्हिसा अटींचे उल्लंघन केल्यामुळे मार्च २०२५ पासून ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले होते.
ऑर्सिनी यांच्याकडे पाच वर्षांचा वैध ई-टुरिस्ट व्हिसा होता. मात्र, अधिकाऱ्यांनी असा दावा केला की त्यांनी यापूर्वीही टुरिस्ट व्हिसाचा वापर शैक्षणिक उपक्रमांसाठी केला होता, जे व्हिसाच्या अटींविरोधात आहे. त्यामुळे त्यांना दिल्ली विमानतळावरून थेट हाँगकाँगला परत पाठवण्यात आले. ऑर्सिनी यांनी मात्र स्पष्ट केले की त्या भारतात केवळ मित्रांना भेटण्यासाठी आल्या होत्या आणि कोणत्याही शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा त्यांचा हेतू नव्हता.
फ्रान्सेस्का ऑर्सिनी या हिंदी आणि उर्दू साहित्याच्या जागतिक ख्यातीच्या अभ्यासक आहेत. त्यांचे “The Hindi Public Sphere 1920–1940” हे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. त्यांनी भारतात अनेक वर्षे अभ्यास केला असून, जेएनयू आणि कॅम्ब्रिज विद्यापीठात अध्यापनही केले आहे. त्या ब्रिटिश अॅकॅडमीच्या फेलो देखील आहेत.
या घटनेनंतर भारतातील अनेक शैक्षणिक आणि साहित्यिक वर्तुळांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काही अभ्यासकांनी याला शैक्षणिक स्वातंत्र्यावर घाला असल्याचे म्हटले आहे. ऑर्सिनी यांना कोणतीही स्पष्ट कारणे न देता परत पाठवण्यात आल्याने, भारतातील विद्वानांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शोध, अभ्यास आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर परिणाम होण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली आहे.
ही घटना भारताच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक प्रतिमेसाठी चिंतेची बाब मानली जात आहे. फ्रान्सेस्का ऑर्सिनी यांचे भारताशी दीर्घकाळाचे शैक्षणिक संबंध असूनही त्यांना अशा प्रकारे परत पाठवणे, हे एक गंभीर पाऊल मानले जात आहे.
SL/ML/SL