ब्रिटिश कंपनी AstraZeneca ने मागे घेतली कोविड १९ लस
लंडन, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी AstraZenecaने आपली कोविड १९ ची लस जगभरातील बाजारातून मागे घेतली आहे. या लसची खरेदी विक्री थांबवण्यात आली असून लसीच्या दुष्परिणामांच्या वृत्तांचा याच्याशी संबंध नसल्याचा दावाही कंपनीने केला आहे. कंपनीने या लसीची निर्मिती व पुरवठाही पूर्णपणे थांबवला आहे. व्यावसायिक कारणांमुळे ही लस बाजारातून काढून टाकत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
याबाबत विरोधाभास असा की, AstraZenecaने फेब्रुवारीमध्ये ब्रिटिश उच्च न्यायालयात सांगितले होते की, त्यांच्या कोविड -१९ लसीचे धोकादायक दुष्परिणाम होऊ शकतात. कंपनीने कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या कोरोना लसीमुळे थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम म्हणजेच टीटीएस होऊ शकतो. या आजारामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होते. तथापि, हे अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्येच घडते. ॲस्ट्राझेनेकावर त्यांच्या लसीमुळे अनेक मृत्यू झाल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर या लसीमुळे इतर अनेकांना गंभीर आजार उद्भवल्याचे किमान ५१ खटले प्रलंबित आहेत. यासाठी पिडीतांनी सुमारे १ हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
एप्रिल २०२१ मध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने ही लस घेतल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचा थेट परिणाम त्याच्या मेंदूवर झाला. याशिवाय स्कॉटच्या मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्रावही झाला. अहवालानुसार, डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीला सांगितले की ते स्कॉटला वाचवू शकणार नाहीत. या संबंधी कंपनीवर पहिल्यांदा खटला दाखल झाला होता. गेल्या वर्षी स्कॉटने ॲस्ट्राझेनेकाविरोधात तक्रार दाखल केली होती. मे २०२३ मध्ये स्कॉट यांच्या आरोपांना प्रतिसाद म्हणून कंपनीने दावा केला की त्यांच्या लसीमुळे टीटीएस होऊ शकत नाही. मात्र, या वर्षी फेब्रुवारीमध्ये हायकोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कंपनीने हा दावा मागे घेतला.
कंपनीकडे सध्या या लसीमधील कोणत्या घटकांमुळे हा आजार होतो याची माहिती उपलब्ध नाही. ही कागदपत्रे समोर आल्यानंतर स्कॉटच्या वकिलाने न्यायालयात दावा केला आहे की ॲस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड लसीमध्ये त्रुटी आहेत आणि या लसीच्या प्रभावाबाबत चुकीची माहिती देण्यात आली होती. शास्त्रज्ञांनी एप्रिल २०२१ मध्ये लस-प्रेरित रोग ओळखला
शास्त्रज्ञांनी मार्च २०२१ मध्ये लस-प्रेरित इम्यून थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम व्हीआयटीटी हा नवीन रोग ओळखला. पीडितांशी संबंधित वकिलांनी दावा केला आहे की, आमचे नियामक अधिकारी सर्व औषधे आणि लसींच्या सुरक्षित वापरासाठी सर्व मानकांचे पालन करतात. विविध देशातील क्लिनिकल चाचण्या आणि डेटाने हे सिद्ध केले आहे की आमची लस सुरक्षा मानकांची पूर्तता करते.
जगभरातील नियामकांनीदेखील हे मान्य केले आहे की लसीचे फायदे त्याच्या दुर्मिळ दुष्परिणामांपेक्षा जास्त आहेत. असे असले तरी ही लस आता ब्रिटनमध्ये वापरली जाणार नाही. कारण अॅस्ट्राझेनेका लसीमुळे होणारी हानी कोरोनाच्या धोक्यापेक्षा जास्त होती. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते की, ही लस १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे. याच्या लाँचच्या वेळी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हा ब्रिटिश विज्ञानाचा मोठा विजय असल्याचे म्हटले होते.
SL/ML/SL
8 May 2024