ब्रिटनला पहिल्या मुस्लीम पंतप्रधान मिळण्याची शक्यता
लंडन, दि. ९ : ब्रिटनच्या राजकारणात सध्या मोठा उलथापालथीचा काळ सुरू आहे. पंतप्रधान कीअर स्टार्मर यांच्यावर जेफ्री एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित वादळामुळे राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर लेबर पक्षातील वरिष्ठ नेत्या आणि सध्याच्या गृहमंत्री शबाना महमूद यांचे नाव पुढे येत आहे. जर त्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या तर ब्रिटनला पहिल्यांदाच मुस्लिम पंतप्रधान मिळतील, हा ऐतिहासिक क्षण ठरेल.
एप्स्टीन फाइल्समध्ये माजी यूके राजदूत पीटर मँडेलसन यांचे नाव पुढे आले असून, ते स्टार्मर यांचे निकटवर्तीय मानले जातात. या उघडकीमुळे लेबर पक्षात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विरोधकांसह पक्षातील अनेक खासदारांनीही स्टार्मर यांना बाजूला होण्याची मागणी केली आहे. या संकटाच्या काळात शबाना महमूद यांना पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
शबाना महमूद या बर्मिंगहॅम येथील खासदार असून, त्यांनी स्थलांतर धोरण, सामाजिक न्याय आणि आर्थिक सुधारणा यावर ठाम भूमिका घेतली आहे. त्यांचा राजकीय प्रवास लेबर पक्षात सातत्याने उंचावत गेला आहे. सध्या त्या गृहमंत्री पदावर कार्यरत आहेत आणि पक्षातील महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा प्रभाव वाढत आहे.
ब्रिटनच्या इतिहासात अद्याप कोणताही मुस्लिम नेता पंतप्रधानपदी पोहोचलेला नाही. त्यामुळे शबाना महमूद यांची संभाव्य निवड ही केवळ राजकीय बदल नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वाची ठरेल. लेबर पक्षातील अंतर्गत घडामोडी आणि स्टार्मर यांचे भविष्य यावर पुढील काही दिवसांत निर्णय होईल.
SL/ML/SL