पुण्यात भाजपवर ब्राह्मण नाराज,जोरदार पोस्टरबाजी

 पुण्यात भाजपवर ब्राह्मण नाराज,जोरदार पोस्टरबाजी

पुणे,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? असा सवाल विचारणारे बॅनर्स कसबा पेठेत लागले आहेत. यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत आणि पुण्यातील ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याचेही स्पष्ट दिसून येत आहे. बहुचर्चित ठरणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने शनिवारी उमेदवार जाहीर केले. कसबा पेठ येथून अपेक्षेप्रमाणे हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आले, तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

या नाराजीचे कारण काय? 

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेक जण नाराज असल्याचे बोलले जात आहे.  एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. चिंचवडमध्ये भाजपने ही परंपरा पाळली. मात्र, कसबापेठेत ही परंपरा पाळली नाही. कसब्यात हेमंत रासने यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

कसबापेठेत झाली कोथरुडची पुनरावृत्ती

या आधी जे कोथरूड मतदार संघात झाले तेच आता कसबा मतदार संघात घडते आहे, घडवून आणले जात आहे. दोन्ही ठिकाणची परिस्थिती जरी वेगळी असली तरी दोन्ही ठिकाणी ब्राह्मण उमेदवारांनाच भाजपने डावलल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सुरक्षित मतदार मतदार संघ हवा म्हणून तेव्हा प्रा. मेधा कुलकर्णी यांचा ‘राजकीय बळी’ घेण्यात आला. जे चंद्रकांत पाटील इतकी वर्षे कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करतात त्यांना स्वतः:ला इतक्या वर्षांत कोल्हापूर मतदार संघ का बांधता आला नाही? हे त्यांचे आणि भाजपचे अपयशच म्हणायचे का? असा सवाल पुण्यातील वर्षानुवर्ष भाजपशी निष्ठावान राहिलेल्या ब्राह्मण समाजाकडून उपस्थित केला जातो आहे.

चंद्रकांत पाटलांसाठी रवींद्र चव्हाणांचा मतदार संघ का नाही देऊ केला? 

चंद्रकांत पाटील यांना खात्रीशिर निवडून येण्यासाठी अगदी सुरक्षितच मतदार संघ हवाच होता तर त्यांना रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघ देखील देता आला असता.  पण जी हिंमत कोथरूड मतदार संघात मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी कापून ती चंद्रकांत पाटील यांना देण्यात देवेंद्र फडणवीस  आणि भाजपच्या धुरिणांनी दाखविली ती त्यांनी डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांच्याबाबतीत दाखविली नाही. कारण भाजपसाठी ‘चव्हाण’ यांच्यापेक्षा ‘कुलकर्णी’ हे सॉफ्ट टार्गेट होते. फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांना धक्का लावला असता तर मनी मसल पॉवर असलेल्या चव्हाण यांनी वेगळी वाट निवडली असती. आणि ते भाजपसाठी यांच्यासाठीही अडचणीचे ठरले असते. त्यामुळे  मेधा कुलकर्णी यांना सहज बाजूला सारून ती जागा चंद्रकांत कुलकर्णी यांना देण्यात आली होती. त्यावेळी देखील पुण्यातील ब्राह्मण वर्गात भाजपाच्या कुटील खेळी बद्दल नाराजीची लाट उसळली होती.

टिळकांना डावलताना साळसुदपणा, जगतापांच्या पत्नीला दिली उमेदवारी

कर्तुत्ववान ब्राह्मण उमेदवाराला गोड बोलुन, पक्षनिष्ठेची आण देऊन डावलण्याचा जो प्रकार कोथरुडमध्ये झाला तोच प्रकार आता  कसबा मतदार संघातही घडला आहे. चिंचवड आणि कसबा येथील उमेदवार जाहीर करण्यापूर्वी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेतली आणि दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती आणि मुलाची ‘समजूत’ काढली. टिळक कुटुंबातील एकाची पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती केली. आता टिळक कुटुंबातील एकाला पक्षप्रवक्तेपद दिल्याने पुन्हा कुटुंबातील अन्य व्यक्तीला उमेदवारी कशी द्यायची? असे कारण देत टिळक कुटुंबातील सदस्याला उमेदवारी नाकारण्यात आली आणि कसब्यासाठी हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आले.  तर चिंचवडमध्ये मात्र दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान आधी कोथरुड मतदार संघात चंद्रकांत पाटील यांच्यासाठी प्रा. मेधा कुलकर्णी यांना डावलल्याने आणि आता कसब्यात मुक्ता टिळक या अत्यंत कर्तुत्ववान आमदाराच्या पश्चात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने पुण्यातील ब्राह्मण वर्गात भाजपकडून फसवणूक झाल्याची भावना तीव्र झाली आहे.

SL/KA/SL

6 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *