राज्यपालांच्या हस्ते टांकसाळीतील नाण्यांवरील पुस्तके प्रकाशित

 राज्यपालांच्या हस्ते टांकसाळीतील नाण्यांवरील पुस्तके प्रकाशित

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वेगवेगळ्या राजवटीत जारी केलेले चलनी शिक्के त्या – त्या काळातील घटनांवर आणि इतिहासावर प्रकाश टाकतात. भारताचा मुद्रा शास्त्रीय ठेवा देशा इतकाच प्राचीन आहे. आज देश कॅशविहीन व्यवहारांकडे वाटचाल करताना देशाचा मुद्रा शास्त्रीय ठेवा जतन करणे आवश्यक आहे. इतिहास जाणून घेण्याचे दृष्टीने प्राचीन नाण्यांचे दस्तावेजीकरण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे.

राज्यपाल बैस यांच्या हस्ते नाणेशास्त्रज्ञ व संग्राहक डॉ दिलीप राजगोर यांनी लिहिलेल्या ‘कॉइन्स ऑफ मुंबई मिंट: १९४७ ते २०२३’ व ‘कॉइन्स ऑफ नॉईडा मिंट: १९८८ ते २०२३’ या दोन पुस्तकांचे सोमवारी (दि. १०) राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

भारतात ५५० पेक्षा अधिक संस्थाने होती व अनेकांची आपापली नाणी होती. छत्रपती शिवाजी महाराजांची टाकसाळ होती, तसेच मुघल, पोर्तुगाली, डच, फ्रेंच व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी शासकांनी देखील आपापली नाणी होती, असे राज्यपालांनी सांगितले. लोकभावनेचा आदर करून सम्राट अकबराने प्रभू राम व सीता यांची प्रतिमा असलेली नाणी काढली होती याचे स्मरण देऊन आजच्या काळात अशी नाणी काढली तर त्यावर वादंग होईल, अशी टिप्पणी राज्यपालांनी केली.

आपल्या वैयक्तिक संग्रहामध्ये व्हिक्टोरिया राणी, राजे पंचम जॉर्ज व षष्ठम जॉर्ज यांचे चित्र असलेली नाणी असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण वापरतो अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.

डॉ दिलीप राजगोर नाणेशास्त्र या विषयावर लिखाण, ब्लॉग व युट्युब चॅनेलच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रबोधन करीत असतात. त्यांच्या मुंबई व नॉईडा टांकसाळीत नाण्यांच्या पुस्तकामधून अनेक दुर्मिळ नाण्यांची माहिती मिळते असे सेक्सॉलॉजिस्ट तसेच नाणे संग्राहक डॉ. प्रकाश कोठारी यांनी यावेळी सांगितले.

प्रकाशन सोहळ्याला लेखक डॉ. दिलीप राजगोर,अशोक सिंग ठाकूर आणि डॉ. राजगोर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

ML/KA/SL

10 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *