काबुलमध्ये तालिबान सरकारच्या मंत्र्याला बॉम्बने उडवले, 12 जण ठार
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मंत्रालयात बुधवारी (11 डिसेंबर) एक मोठा हल्ला झाला. ज्यामध्ये तालिबान सरकारचे निर्वासित मंत्री खलील उर-रहमान हक्कानी आणि त्यांच्या तीन अंगरक्षकांसह 12 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी काबूलमधील निर्वासित मंत्रालयाच्या कंपाऊंडमध्ये हा स्फोट झाला. हक्कानी हे खोस्तहून येणाऱ्या काही लोकांना होस्ट करत असताना हा हल्ला झाला. खलील हक्कानी हे तालिबानचे अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे काका आणि हक्कानी नेटवर्कमधील एक प्रमुख व्यक्ती होते. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर 7 सप्टेंबर 2021 रोजी निर्वासितांचे कार्यवाहक मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. इस्लामिक स्टेट आणि तालिबान यांच्यात सध्या संघर्ष सुरु आहे. त्यामुळे हा हल्ला इसिसकडून केला गेला असावा, असे सांगितले जात आहे.