बेरोजगार तरुणांची बोगस ॲपमधून होणारी फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना करा
 
					
    मुंबई, दि २८ : राज्यातील बेरोजगार तरुणांची रोजगार देण्याच्या आमिषाने बोगस ॲपच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही अतिशय गंभीर बाब असून या संदर्भात दाखल होणाऱ्या तक्रारींची पोलीसांकडून तातडीने दखल घेण्यात यावी तसेच या संदर्भात येत्या 15 दिवसात अतिरिक्त मुख्य सचिव, गृह यांच्याकडे बैठक घेण्यात यावी, असे निदेश महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. आज विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या गैरव्यवहारासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली, त्याप्रसंगी हा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रीय कौशल्यविकास महामंडळाचे चिन्ह वापरुन असे बनावट ॲप तयार केले जातात. बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून या ॲपद्वारे पैसे उकळले जातात. काही दिवसांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधित तरुण पोलीसात तक्रार दाखल करायला जातात त्यावेळी त्यांना ताटकळत ठेवले जाते, तक्रार दाखल करुन घेतली जात नाही. बनावट ॲप चालवणाऱ्या टोळ्या यांचे पोलीसांशी संगनमत असण्याची शक्यता आहे, असे मुद्दे यावेळी विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी उपस्थित केले. या महत्वाच्या बैठकीला राष्ट्रीय कौशल्यविकास महामंडळ व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहिल्याबद्दल यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.
गृह विभागाचे सह सचिव राहुल कुलकर्णी, पोलीस उप आयुक्त बजरंग बनसोडे, सायबर विभागाचे प्रविण बनगोसावी बैठकीस उपस्थित होते. अशा प्रकारच्या गुन्हृयांना कडक प्रतिबंध व्हावा या दृष्टिने निश्चित उपाययोजना करणे आवश्यक असून या संदर्भात अतिरिक्त मुख्य सचिव, गृह यांनी 15 दिवसाच्या आत विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे आणि सर्व संबंधितांची बैठक घ्यावी आणि निश्चित स्वरुपाची उपाययोजना करावी, असे निर्देश यावेळी विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.ML/ML/MS
 
                             
                                     
                                    