कॅनेडियन बोगदा तंत्रज्ञानविषयक शिष्टमंडळाने जाणून घेतली मुंबईच्या विविध प्रकल्पांची माहिती*

 कॅनेडियन बोगदा तंत्रज्ञानविषयक शिष्टमंडळाने जाणून घेतली मुंबईच्या विविध प्रकल्पांची माहिती*

मुंबई, दि २
कॅनडा येथून आलेल्या बोगदा तंत्रज्ञानविषयक शिष्टमंडळाने (Canadian Tunnel Technologies Delegation) धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण), मुंबई किनारी रस्ता (उत्तर) आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत, त्यातील तंत्रज्ञानाबाबत आज (दिनांक २ डिसेंबर २०२५) सविस्तर माहिती जाणून घेतली.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील सभागृहात संगणकीय सादरीकरणाद्वारे या तीनही प्रकल्पांबाबत माहिती देण्यात आली. हे कॅनेडियन शिष्टमंडळ दिनांक १ ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी भारतात आले आहे. या कालावधीत हे शिष्टमंडळ भुयारी मार्गांचा वापर करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांना भेटी देत आहेत. या अनुषंगाने त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पांबाबत माहिती घेतली.

या शिष्टमंडळात टनेलिंग असोसिएशन ऑफ इंडियातील टनेल विभागाचे प्रमुख श्री. संदीप सिंह, टनेलिंग असोसिएशन ऑफ कॅनडाचे प्रतिनिधी श्री. जॉन हाबिमाना, व्हेक्टर टेक्नॉलॉजी लिमिटेडचे श्री. लियाओ हायश्यू, ऑरिका डिजिटल सोल्यूशन्सचे श्री. फहमी अमिनुद्दीन, ‘रॉकसायन्स’चे डॉ. मनोज वर्मन आणि कॅनडा सरकारचे व्यापार आयुक्त श्री. योआखिम रोचा आदी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. पुरुषोत्तम माळवदे, मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाचे प्रमुख अभियंता श्री. मंतय्या स्वामी, कार्यकारी अभियंता (मुंबई किनारी रस्ता उत्तर) श्री. वैभव गांधी तसेच गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) या प्रकल्पांशी संबंधित अभियंते उपस्थित होते.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामध्ये (दक्षिण) वापरण्यात आलेली सकार्डो ही वायुवीजन प्रणाली भारतात प्रथमच वापरण्यात आली आहे. या प्रणालीबाबत तसेच दोन स्वतंत्र भूमिगत बोगदे खोदतांना कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला, याबाबत शिष्टमंडळाने माहिती जाणून घेतली. या भूमिगत बोगद्यांच्या बांधकामाची गुणवत्ता तपासण्यासाठी बोगद्यांमध्ये भविष्यात संवेदक (सेन्सर्स) बसविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्याबाबत महानगरपालिकेने विचार करावा, असे मतही या शिष्टमंडळातील अभ्यासू सदस्यांनी मांडले.

तसेच, प्रगतिपथावर असलेले गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) आणि नियोजित मुंबई किनारी रस्ता (उत्तर) या प्रकल्पांबाबत शिष्टमंडळातील सदस्यांनी माहिती घेतली. गोरेगाव-मुलुंड जोड मार्गासाठी कोणकोणत्या विभागांकडून परवानग्या घेतल्या, पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाणार आहे, याबाबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर या शिष्टमंडळाने धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाला (दक्षिण) भेटही दिली. भूमिगत बोगदे, आंतरमार्गिका, पदपथ, विहारमार्ग पाहून शिष्टमंडळाने प्रकल्पाचे कौतुक केले.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *