शरीरसौष्ठव संघटक प्रशांत आपटे यांचे निधन

 शरीरसौष्ठव संघटक प्रशांत आपटे यांचे निधन

मुंबई,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शरीरसौष्ठव आणि शरीरसौष्ठवपटूंच्या मदतीसाठी सदैव पाठीशी उभे राहणारे शरीरसौष्ठव संघटक प्रशांत आपटे यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शरीरसौष्ठव क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर बदलापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

एक बांधकाम व्यावसायिक असलेले आपटे आपल्या शरीरसौष्ठव खेळावरील प्रेमापोटी ११ वर्षांपूर्वी शरीरसौष्ठव संघटनेत दाखल झाले आणि त्यांनी आपल्या दानशूर वृत्तीमुळे संघटनेत आणि खेळाडूंमध्ये आदराचे स्थान निर्माण केले. प्रारंभी ते ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. त्यांचे प्रभावी कार्य पाहून त्यांच्यावर दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदाचीही धुरा सोपविण्यात आली. तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा दक्षिण आशियाई स्पर्धांना संजीवनी देण्याचे कार्यही केले. गेल्याच वर्षी त्यांनी वैयक्तिक कामाच्या व्यापामुळे राज्य संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

शेकडो खेळाडूंचे आधारस्तंभ
प्रशांत आपटे यांचे कुटुंबीय राजकारणात असले तरी ते सदैव राजकारणापासून दूरच राहिले. पण त्यांनी सामाजिक क्षेत्राशी आपली नाळ जोडताना अंबरनाथच्या रोटरी क्लबमध्ये सक्रिय झाले. त्यांनी बदलापूरला आरोग्य साधना हेल्थ सेंटर नावाची अद्ययावत जिमसुद्धा सुरू केली. गेले दीड दशक ते बदलापूरात रोटरी ठाणे श्री स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करताहेत. शेकडो खेळाडूंचे आधारस्तंभ असलेल्या आपटे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कालखंडात खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या श्रीमंत करण्यासाठी स्पर्धांच्या बक्षीसांच्या रकमेत भरघोस वाढ केली. तसेच ते अनेक खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात देत आले आहेत.

ML/KA/SL

15 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *